दांडेकर नगरातील एकाच कुटुंबातील १३ जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:04 PM2020-06-29T12:04:13+5:302020-06-29T12:04:31+5:30
सात महिन्याच्या बाळाचा समावेश
जळगाव : जळगाव शहरात आज तब्बल ४४ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या आता थेट ७०५ झाली आहे. पिंप्राळा दांडेकर नगरातील एकाच कुटुंबातील तब्बल १३ जण बाधित झाले आहेत. या सर्वांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे रविवारी २५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पिंप्राळा दांडेकर नगरातील या कुटुंबातील दोन सदस्य यापूर्वीच पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या १३ झाली आहे. यात ७५ वर्षीय वृद्ध आणि ७ महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. यात फक्त २० वर्षीय युवतीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. या कुटुंबातील सदस्यांना कुठलीही लक्षणे नसताना त्यांना अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती मिळाली.
याशिवाय शिवाजी नगर, वाघनगर, शनिपेठ, तांबापूरा, कांचननगर, मयुर कॉलनी, वाल्मिक नगर, खुबचंद साहित्यानगर, अक्सानगर, गेंदालाल मिल, समता नगर, चौघुले प्लॉट, श्रीकृष्ण कॉलनी याठिकाणी प्रत्येकी एक- एक बाधित आढळून आले आहेत.
रविवारी २५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या आता ३६१ झाली आहे.
गेल्या काही दिवसापासून मुक्ताईनगर व बोदवड हे दोन तालुक्यात रुग्ण संख्या शून्य होती. रविवारी मुक्ताईनगरात ५ तर बोदवड येथे तब्बल ११ रुग्ण आढळून आले आहेत.
तीन जणांचे मृत्यू
शहरातील रहिवासी असलेल्या तीन जणांचा रविवारी मृत्यू झाला. यात ५० व ७० वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला तसेच चाळीसगाव तालुक्यातील ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे मृतांची संख्या ४४ झाली आहे.
-रविवारी एका दिवसात ९५२ अहवाल आले आहेत. त्यात १८९ अहवाल पॉॅझिटीव्ह तर ७६६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत