"खाली उतरुन पाहिलं तेव्हा रुळावर आईचा मृतदेह होता"; सूनेनं सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:42 IST2025-01-23T17:41:52+5:302025-01-23T17:42:17+5:30
जळगाव रेल्वे अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांच्या नातेवाईकांनी आपली कहाणी सांगितली आहे

"खाली उतरुन पाहिलं तेव्हा रुळावर आईचा मृतदेह होता"; सूनेनं सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
Jalgaon Train Accident: जळागाव जिल्ह्यातील मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई मार्गावर माहेजी ते परधाडे स्थानकांदरम्यान बुधवारी मोठा रेल्वे अपघात घडला. लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसच्या एका डब्यात आग लागल्याची अफवा पसरल्याने घाबरून प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या. त्याचवेळी भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने बाहेर आलेल्या प्रवाशांना धडक दिली. त्यापैकी १२ प्रवाशांचा जागीच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान, मृत्यू झाला. तर जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातादरम्यान, अनेकांनी आपल्या कुटुंबियांना गमावलं आहे. अशातच लखनऊवरुन मुंबईला येत असलेल्या सूनेनं सासूचा मृतदेह रेल्वे रुळाखाली दिसल्याचे सांगितल्यानंतर अनेकांना धक्का बसला.
लखनऊहून मुंबईला येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे १३ जणांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले. अनेक प्रवाशांनी घाबरून ट्रेनची चेन ओढली आणि अचानक खाली उड्या मारल्या. त्याचवेळी बाजूच्या रुळावर येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेकांना चिरडले. या घटनेत १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. अपघात एवढा भीषण होता की, काही ठिकाणी मानवी अवयव आणि मृतदेह रुळावर विखुरले होते. याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लखनऊहून पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना झाली होती. बुधवारी दुपारी ४.४२ वाजता ही ट्रेन मुंबईपासून ४२५ किमी अंतरावर असलेल्या जळगावच्या पाचोरा स्थानकाजवळ पोहोचली तेव्हा इंजिनलगतच्या डब्यात आग लागल्याची अफवा पसरली. आरडाओरड होताच घाबरलेल्या प्रवाशांनी तत्काळ गाडी थांबवली आणि डब्यातून उड्या मारल्या. त्याचवेळी बंगळुरूहून दिल्लीकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने रूळावर उभ्या असलेल्या प्रवाशांना धडक दिली. त्यात काही प्रवासी चिरडले गेले, काही दूर फेकले गेले. रुळांवर झालेल्या मृत्यूच्या या तांडवानंतर आता अपघाताचे साक्षीदार आणि मृतांच्या नातेवाईकांनी आपली कहाणी सांगितली आहे.
लखनऊवरुन मुंबईला येणाऱ्या एका महिलेचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तिच्या सुनेने त्यावेळी घडलेला प्रसंग सांगितला. "मला दुपारी आई म्हणाली होती की तू झोपून जा. मग अचानक म्हणाली इथून पळ बोगीत आग लागली आहे. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली त्यामुळे मीही दुसऱ्या बाजूच्या दरवाजाने खाली उतरले. तिथं आग किंवा धूर काहीच नव्हतं. पण शेजारच्या रुळावर पाहिलं तर आईचा मृतदेह होता," असं मृत कमला भंडारी यांची सून राधा भंडारी यांनी सांगितले.
घटनेच्या वेळी ट्रेनमध्ये असलेल्या जगमोहन पासवान यांनी सांगितले की, "आमच्या कोचमध्ये विक्रेते होते, त्यांच्यापैकी एकाने आरडाओरडा केला की काही कोचला आग लागली आहे काही सेकंदात ट्रेन थांबली आणि लोक दरवाजाकडे धावले. माझे नातेवाईक उत्तम पासवान यांनीही ट्रेनमधून उडी मारली आणि त्यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. उत्तमप्रमाणेच कोचच्या उजव्या बाजूने उडी मारणारे अनेक जण जखमी झाले आणि अनेकांना जीव गमवावा लागला. मी डाव्या बाजूने उतरलो आणि त्यामुळे इतरांप्रमाणेच वाचलो."