मनपाच्या कोविड केअर सेंटर मध्ये १३०० बेड खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:14 AM2021-04-17T04:14:41+5:302021-04-17T04:14:41+5:30
शहरातील एकूण ॲक्टिव रूग्ण - २५३५ कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेले रुग्ण - ३९० घरीच राहून उपचार ...
शहरातील एकूण ॲक्टिव रूग्ण - २५३५
कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेले रुग्ण - ३९०
घरीच राहून उपचार घेत असलेले रुग्ण - ५५६
खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण - ५०० सुमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. यामध्ये कमी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असून, अशा रुग्णांवर महापालिकेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर मध्ये प्राथमिक उपचार सुरू आहेत. महापालिकेने या ठिकाणी एकूण १७०० बेडची व्यवस्था केली असली तरी या ठिकाणी सद्य स्थितीत केवळ ३९० रुग्णांवर प्राथमिक उपचार सुरू आहेत. तर १३०० हून अधिक बेड याठिकाणी खाली पडले आहेत. शहरात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी कमी लक्षणे असलेल्या रुग्णांकडून मनपाच्या कोविड केअर सेंटरपेक्षा गृह विलगीकरणला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे.
मे २०२० पासून जिल्हाभरात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर महापालिका प्रशासनाने अभियांत्रिकी महाविद्यालयात कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना व त्यांच्या संपर्कातील संशयितांना देखील काही दिवस क्वारंटाईन केले जात होते. मात्र, मनपा प्रशासनाने अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू केलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये केवळ कमी लक्षणे असलेल्या रुग्णांनाच ठेवले जात आहे. मात्र रुग्णांचा संपर्कात आलेल्या संशयितांचा शोध महापालिका प्रशासनाकडून या टप्प्यात फारसा घेतला जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान , महापालिकेने कोविड केअर सेंटर मध्ये व्यवस्था केली असली तरी अनेक रुग्ण या ठिकाणी न थांबता घरीच राहून उपचार करून घेण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे मनपाच्या कोविड केअर सेंटर मधील तब्बल १३०० हून बेड अद्यापही खाली आहेत.
गृह विलगीकरणतील रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेचे पथक कार्यान्वित
शहरात ५५० हून अधिक रुग्ण सद्यस्थितीत घरीच राहून उपचार करून घेत आहेत. मात्र हे रुग्ण घरीच थांबून आहेत की नाही हे तपासण्याची जबाबदारी महापालिकेत प्रशासनाची आहे. यासाठी महापालिकेने आरोग्य विभागांतर्गत काही पथके नेमली आहेत. मात्र आतापर्यंत या पथकांकडून गृह विलगीकरण च्या नियमांची पायमल्ली करण्याबाबत कोणत्याही रुग्णावर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच मनपा वैद्यकीय विभागाचा पथकाकडून गृह विलगीकरणमध्ये असलेल्या रुग्णांचा घरी जाऊन दररोज त्या रुग्णांच्या तब्येतीविषयी तपासणी केली जात असल्याची माहिती मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी '' लोकमत ''ला दिली.
मानसिक आधार मिळण्यासाठी रुग्णांचे होम आयसोलेशन ला प्राधान्य
कोरोना काळात रुग्णांना मानसिक धीर देखील मिळणे महत्त्वाचे आहे. शहरात झालेल्या अनेक मृत्यूबाबत अनेक रुग्णांचे मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे मृत्यू ओढवला असल्याचे कारण देखील वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून पुढे केले जात आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या दुसरा लाटेत अनेक रुग्ण की ज्यांना कमी लक्षणे आहेत असे रुग्ण महापालिकेच्या कोविड केअर सेंटर मध्ये थांबणे ऐवजी घरीच राहून उपचार घेण्यात प्राधान्य देत आहेत. मात्र यामुळे घरातील ज्या सदस्यांना कोरोना चा संसर्ग झालेला नाही अशा सदस्यांना देखील कोरोना चा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दहा दिवस घरीच थांबणे महत्वाचे
एखादा रुग्ण कोरोना बाधित झाल्यानंतर संबंधित रुग्णाला कमी लक्षणे असतील व संबंधित रुग्ण घरीच राहून उपचार करत असते तर त्या रुग्णाला दहा दिवस घरीच थांबणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत शहरात १५०० हून अधिक रुग्ण घरी राहून उपचार घेत असले तरी त्यापैकी १ हजारहून अधिक रुग्णांचा दहा दिवसांचा काळ संपल्यामुळे या रुग्णांचा ॲक्टिव रूग्णांमध्ये समावेश होऊ शकत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत शहरात ५५६ रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. तसेच दिवसाला ४० हून अधिक रुग्णांचा घरीच राहून उपचार घेण्याबाबतचे अर्ज महापालिकेकडे प्राप्त होत असल्याची माहिती महापालिका वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे.