131 पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित
By admin | Published: March 21, 2017 12:31 AM2017-03-21T00:31:04+5:302017-03-21T00:31:04+5:30
मुक्ताईनगर तालुक्यात पाणीपुरवठा विस्कळीत : ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती
मुक्ताईनगर : तालुक्यातील 52 ग्रामपंचायती अंतर्गत येणा:या 131 पाणीपुरवठा करणा:या नळ जोडण्यांचा वीजपुरवठा थकीत बिलापोटी खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावरच पाण्याची दाहकता ग्रामस्थांमध्ये दिसून येत आहे. मुक्ताईनगर ग्रामपंचायतीने चालू वीज बिलापोटी दोन लाख रुपयांचा धनादेश वीज वितरण कंपनीकडे सोपविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तालुक्यातील 52 ग्रामपंचायती कडे 9 कोटी 39 लाख रुपयांची वीज थकबाकी आहे. मार्चअखेर थकीत रकमेच्या वसुलीसाठी वीज वितरण कंपनी खळबळून जागी झाली आहे. मुक्ताईनगर शहरासह तालुक्यातील सर्वच वीज वितरण कंपनीच्या पथकाने शनिवारी अचानक सर्जिकल स्ट्राईक करत तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींकडे मोर्चा वळवला. 52 ग्रामपंचायती अंतर्गत येणा:या 131 पाणीपुरवठा करणा:या नळ जोडण्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्रा. पं.मध्ये तालुक्याची प्रमुख मुक्ताईनगर व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कोथळी ग्रा.प.चादेखील समावेश आहे.
मुक्ताईनगर ग्रा. पं.ने सोमवारी चालू बिलापोटी दोन लाख रुपयांचा धनादेश वीज वितरण कंपनीकडे दिल्याची माहिती सरपंच ललित महाजन व ग्रामविस्तार अधिकारी प्रताप बोदडे यांनी दिली. पाणीपुरवठा खंडित केल्यानंतर आता कंपनी घरगुती व वाणिज्य वीज जोडणीचा विचार करत आहे. तालुक्यातील 7 हजार 183 वीज ग्राहकांकडे तब्बल 88 लाख रुपये वीज बिल थकीत झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या आठही कक्षांमध्ये थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्रा. पं. मध्ये खालील गावांचा समावेश आहे. (वार्ताहर)