अर्ध्या तासातच १४ गुरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2017 11:34 PM2017-03-04T23:34:54+5:302017-03-04T23:34:54+5:30
स्टार्च फॅक्टरीचे रासायनिक सांडपाणी पिऊन १४ जनावरांचा झालेला मृत्यू सुधाकर पाटील हे गुरूवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शेतात पाहणी करण्यासाठी गेले असताना उघड झाला.
धुळे : देवपूरातील बिलाडी रोडवरील ट्रेडको स्टार्च फॅक्टरीचे रासायनिक सांडपाणी पिऊन १४ जनावरांचा झालेला मृत्यू सुधाकर पाटील हे गुरूवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शेतात पाहणी करण्यासाठी गेले असताना उघड झाला.
शेतातील गुरे आपल्या मालकीची असून रासायनिक पाणी पिल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे चंद्रकांत केले यांनी सांगितले. सुधाकर पाटील यांना फॅक्टरीचे रासायनिक सांडपाणी शेतातील खड्ड्यात साचलेले दिसले. पाणी पिऊन भोवळ येऊन जमिनीवर पडत असलेली जनावरेही त्यांना दिसून आली. त्यांनी ही बाब चंद्रकांत केले व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सैंदाणे यांना भ्रमणध्वनीवरून सांगितली.
आरंभी डॉ. सैंदाणे यांनी जनावरांवर औषधोपचार केले. परंतु, जनावरे कोणताही प्रतिसाद न देता तडफडत होती. या वेळी पशुसंवर्धन विभागाचे डॉ. निकमही आले. त्यांनीही गुरांवर उपचार सुरू केले. मात्र, उपचार सुरू असताना अर्ध्या तासातच १४ गुरांचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप देवरे यांनाही बोलविले. त्यांनीही मृत जनावरांची पाहणी केली. त्यांनीच या जनावरांचे शवविच्छेदन केले. त्यात विषबाधेमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचे डॉ. देवरे यांनी सांगितले.