14 कोटींच्या रस्ते कामांना आचारसंहितेमुळे ‘ब्रेक’
By admin | Published: January 7, 2017 12:52 AM2017-01-07T00:52:14+5:302017-01-07T00:52:14+5:30
विकास कामांना फटका : नागरिकांच्या अडचणीत भर पडणार
जळगाव : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी लागू झालेल्या आचारसंहितेचा मनपाच्या प्रस्तावित विकास कामांना फटका बसला आहे. मनपाने 10 कोटीच्या निधीतून रस्ते व गटारींचे काम तसेच 3.75 कोटींच्या रस्ते अनुदानातून रस्त्यांची कामे प्रस्तावित केली होती. त्या कामांचे कार्यादेश देण्याची कार्यवाही सुरू असतानाच ही आचारसंहिता लागू झाल्याने विकासकामांना फटका बसला आहे.
पावसाळ्यानंतर कामे धीम्या गतीने
आधीच शहरातील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. मनपाने मोठा गाजावाजा करून चारही प्रभाग समिती कार्यालयांच्या क्षेत्रात प्रत्येकी 30 रूपये तर प्रमुख रस्त्यांसाठी 80 लाख रूपयांची तरतूद करून निविदा काढून कामे सोपविण्यात आली. मात्र तरीही ठराविक रस्ते वगळता अनेक रस्त्यांवर खड्डे जैसे-थे असल्याचे दिसून येत आहे. मक्तेदार काम करत नसेल तर मनपा बांधकाम विभागाने ते काम करायला हवे होते. मात्र पावसाळा संपून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरीही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यात ही रस्त्यांची कामेही रखडल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे.
34 हजार मतदार बजावणार हक्क
जळगाव : पदवीधर मतदार संघासाठी 3 फेब्रुवारी रोजी होणा:या या मतदानासाठी जिल्ह्यातील 34 हजार 442 पदवीधर आपला हक्क बजावणार आहेत. त्यासाठी 41 केंद्र तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, माहिती अधिकारी मिलिंद दुसाने उपस्थित होते.
पदवीधर मतदारांची यादी 7 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीनुसार जिल्ह्यात 34 हजार 442 मतदार आहेत. त्यासाठी 41 संभाव्य मतदान केंद्र राहणार आहेत. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणे व मतमोजणी ही कामे नाशिक येथेच होणार आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी बँक, आयकर विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली. पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी कायदा व सुव्यवस्था कायम राखत आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले.