संजय गांधी निराधार योजनेच्या १४ लाखांवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:15 AM2021-04-22T04:15:51+5:302021-04-22T04:15:51+5:30
लिपिकाचा प्रताप : स्वत:सह पत्नी, शालकाच्या खात्यावर वळवली रक्कम लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ज्यांना कोणाचाही आधार नाही, अशा ...
लिपिकाचा प्रताप : स्वत:सह पत्नी, शालकाच्या खात्यावर वळवली रक्कम
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ज्यांना कोणाचाही आधार नाही, अशा निराधारांना शासनाकडून दरमहा विशिष्ट रक्कम देण्यात येते. मात्र, ही रक्कम वाटपाची जबाबदारी ज्याच्यावर होती, त्यानेच स्वतः तसेच पत्नी व शालकाच्या बॅंक खात्यात रक्कम परस्पर वळवून तब्बल चौदा लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुधवारी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय गांधी निराधार योजना अ नगरपालिका क्षेत्र विभागाचा लिपिक तथा महसूल सहाय्यक संदीप प्रल्हाद शिरसाठ व त्याची पत्नी सोनल संदीप शिरसाठ (रा. वाघ नगर) व शालक संदीप अशोक भालेराव (रेल्वे काॅलनी, अमळनेर) अशी आरोपींची नावे आहेत. शासनातर्फे अव्वल कारकून अनिल जगन्नाथ पठाडे यांनी याविषयी फिर्याद दिली आहे.
बॅंकेच्या निदर्शनास आला प्रकार
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँकेत आलेल्या लाभार्थ्यांची नावे वेगवेगळी असताना बँक खाते क्रमांक मात्र तीनच जणांचा होता. सर्व रक्कम याच खात्यांवर जमा केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्टेट बँकेच्या मुख्य शाखेचे व्यवस्थापक यांनी १५ एप्रिल राेजी तहसीलदार यांना पत्र लिहून या प्रकाराची पडताळणी करण्याचे सूचित केले. त्यानुसार तहसीलदारांनी अव्वल कारकून अनिल पठाडे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. या चौकशीत शिरसाठ याने लाभार्थ्यांच्या यादीत तसेच कागदपत्रात फेरफार करून नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे लाभार्थ्यांचे वेतन स्वतः तसेच पत्नी सोनल हिच्या खात्यात प्रत्येकी २० हजार रुपये याप्रमाणे ४० हजार रुपये जमा केले. त्यानंतर जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या बिलातही फेरफार करून तेरा लाख पन्नास हजार रुपये या दोघांसह शालकाच्या बँक खात्यात जमा केले. हा प्रकार करताना शिरसाठ याने लाभार्थ्यांच्या यादीतही फेरफार केल्याचे उघड झाले. लाभार्थ्यांची नावे वेगवेगळी असताना वारंवार खाते क्रमांक मात्र एकच येत असल्याने तेथेच शंकेची पाल चुकचुकली अन् शिरसाठचा भांडाफोड झाला. गरिबांच्या पैशावर डल्ला मारल्याचे निष्पन्न झाल्याने अनिल पठाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात संबंधित तिघांविरुद्ध फिर्याद दिली. शासनाच्या रकमेचा अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती.