नेरी नाका स्मशानभूमीत एकाच दिवशी १४ जणांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:15 AM2021-03-15T04:15:06+5:302021-03-15T04:15:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असून, आता गेल्या काही दिवसांत मृतांची संख्यादेखील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असून, आता गेल्या काही दिवसांत मृतांची संख्यादेखील वाढू लागली आहे. शनिवारी शहरातील नेरी नाका स्मशानभूमी येथे एकाच दिवशी तब्बल १४ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. एकापाठोपाठ एक मृतदेह स्मशानभूमीत येत असल्याने ओटेदेखील कमी पडू लागले आहेत. यामुळे अनेक मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना काही काळ प्रतीक्षादेखील करावी लागत असल्याचे चित्र नेरीनाका स्मशानभूमीत पाहायला मिळत आहे. रविवारीदेखील स्मशानभूमीत एकाच वेळी सात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जुलै ते सप्टेंबरदरम्यानदेखील शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या वाढत गेली होती. यामुळे नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यानंतर मनपा प्रशासनाने नेरी नाका स्मशानभूमीवर केवळ कोरोनामुळे मृत्यू झाल्यावरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सद्य:स्थितीत नेरी नाका स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांसह इतर कारणांमुळे मृत्यू झालेल्यांवरदेखील अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. यामुळे एकाच ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जळगाव शहरात जिल्हाभरातील रुग्णांवर खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे काही मृतांवर जळगावमध्येच अंत्यसंस्कार करावे लागतात. अशा परिस्थितीत महापालिकेच्या नेरी नाका स्मशानभूमीवर अंत्यसंस्कारासाठी अनेकांना वाट पाहावी लागत आहे.
गॅस दाहिनीमुळे काही प्रमाणात मिळाला दिलासा
नेरी नाका स्मशानभूमीत केशव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने अत्याधुनिक गॅस दाहिनी बसविण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यापासून ही दाहिनी बसविण्यात आली असून, यामुळे स्मशानभूमीत ऐनवेळी येणाऱ्या मृतदेहांवर वेळीच अंत्यसंस्कार करता येत आहेत. मात्र, तरीही मृतदेहांची संख्या वाढत असल्याने अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण होताना दिसून येत आहेत. तरी गॅस दाहिनीमुळे अनेक नागरिकांची होणारी गैरसोय टाळता येत आहे. गॅस दाहिनीवर दिवसातून चार ते पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
खाजगी रुग्णालयातील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येताहेत अडचणी
नेरी नाका स्मशानभूमीत खाजगी रुग्णालयातील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही अडचणी येत आहेत. खाजगी रुग्णालयात एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह थेट स्मशानभूमीत आणला जात आहे, तसेच मृताचे नातेवाईक अनेक वेळा बाहेरगावाचे असल्याने या ठिकाणांची प्रक्रिया पूर्ण करण्यास संबंधितांना अडचणी येत आहेत, तसेच स्मशानभूमीमधील मनपा कर्मचाऱ्यांनादेखील याबाबत कोणतीही पूर्वसूचना मिळत नसल्याने अनेकदा नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, मृतांची संख्या वाढू लागल्यास या ठिकाणी ओटे वाढविण्याबाबतदेखील मनपा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे, तसेच पूर्वीप्रमाणे नेरी नाका स्मशानभूमीवर केवळ कोरोनामुळे मृत पावलेल्यांवरच अंत्यसंस्कार करण्याबाबतचा निर्णयदेखील मनपा प्रशासनाकडून लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.