कोरोनामुळे १४ शिवशाही बसेस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:12 AM2021-04-03T04:12:43+5:302021-04-03T04:12:43+5:30
अल्प प्रतिसाद : दररोज होत आहे दोन लाखांचे नुकसान प्रतिदिनी दोन लाखांचा फटका : लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...
अल्प प्रतिसाद : दररोज होत आहे दोन लाखांचे नुकसान
प्रतिदिनी दोन लाखांचा फटका :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने, शिवशाहीच्या प्रवाशी संख्येवर याचा मोठा परिणाम झाला आहे. प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने १८ शिवशाही बसेसपैकी विविध मार्गांवर धावणाऱ्या १४ बसेस बंद करून या मार्गावर सध्या बसेस सोडण्यात येत आहेत. शिवशाही बस बंदमुळे दररोज महामंडळाला दोन लाखांचा आर्थिक फटका बसत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
कोरोनामुळे सहा महिने बंद असलेल्या शिवशाही बसेस गेल्या वर्षी दिवाळीनंतर पुन्हा सुरू झाल्या. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर सर्व मार्गावर या बसेस पूर्ववत धावू लागल्या होत्या. प्रवाशांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. मात्र, गेल्या महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने, महामंडळाची प्रवासीसंख्या घटली आहे. विशेषतः पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, लातूर, धुळे, नंदुरबार या मार्गांवरील प्रवाशांची संख्या खूपच घटल्यामुळे महामंडळाच्या या मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसेसना तोटा सहन करावा लागत आहे. क्षमतेपेक्षाही कमी उत्पन्न येत असल्यामुळे, शिवशाहीचा डिझेल खर्चही निघत नव्हता. त्यामुळे महामंडळाने या मार्गावरील नेहमी धावणाऱ्या शिवशाही बसेस बंद करून, त्या ठिकाणी शिवशाहीच्या वेळापत्रकाप्रमाणे साध्या बसेस सोडण्यात येत आहे. मात्र, या साध्या बसेसच्या सेवेलाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
सध्या १८ पैकी ४ शिवशाही सुरू
महामंडळातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार जळगाव विभागाकडे एकूण १८ शिवशाही बसेस आहेत. जिल्ह्याभरात विविध आगारांकडे या बसेस वाटण्यात आल्या असून, त्या ठिकाणाहून या बसेस विविध मार्गांवर धावत आहेत. मात्र, सध्या कोरोनामुळे शिवशाहीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः शिवशाही बसेस या वातानुकूलित असल्याने त्यांतील वातावरणाच्या माध्यमातूनही कोरोना पसरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळेही प्रवाशांची संख्या घटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे विविध मार्गांवर धावणाऱ्या १८ पैकी १४ शिवशाही काही कालावधीसाठी बंद करण्यात आल्या असून, फक्त चार शिवशाही सध्या सुरू आहेत. यात जळगाव आगाराच्या औरंगाबाद मार्गावर दोन शिवशाही बसेस व अमळनेर आगाराच्या पुणे मार्गावर दोन शिवशाही बसेस सुरू असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
कोरोनामुळे शिवशाही बसेसची प्रवासी संख्या खूपच कमी झाली असून, इतर मार्गांवरील प्रवासी संख्येची परिस्थितीही तशीच आहे. जोपर्यंत प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत नाही, तोपर्यंत शिवशाही बसेस काही कालावधीपुरत्या बंद राहतील.
दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी