एकाच दिवसात आढळले १४ रुग्ण, आता इतरांच्या शोधासाठी मोहीम!
By अमित महाबळ | Published: October 2, 2023 07:48 PM2023-10-02T19:48:18+5:302023-10-02T19:48:18+5:30
३ ते १३ ऑक्टोबर : क्षयरुग्ण शोध मोहीम
जळगाव : केंद्र सरकारची महत्वाकांक्षी मोहीम असलेल्या ‘आयुष्मान भव’अंतर्गत गेल्या शनिवारी, जळगाव जिल्ह्यात झालेल्या तपासणीत क्षयरोगाचे १४ रुग्ण आढळून आले आहेत. प्राथमिक टप्प्यावरच या आजाराचे निदान झाल्यास सहा महिन्यात रुग्ण बरा होतो. दरम्यान, दि. ३ ते १३ ऑक्टोबरपर्यंत क्षयरुग्ण शोध मोहीम राबिलली जाणार आहे. या आजारावर सरकारी केंद्रात मोफत उपचार उपलब्ध आहेत.
क्षयरोगाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांनी न घाबरता, स्वत:हून सरकारी दवाखान्यात तपासणी करावी. खासगी डॉक्टरांनीही या रुग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राला कळवावी. जिल्ह्यात १ जानेवारी ते ३० सप्टेंबरअखेर २७१० क्षयरोगी आहेत. गेल्या शनिवारी, १४ रुग्ण आढळले. त्यावेळी एका दिवसात ४ हजार ४०९ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी १०५२ जणांच्या थुंकीची तपासणी केली असता, नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवड्यांहून अधिक दिवस असलेला ताप व खोकला, रात्रीच्या वेळेस येणारा ताप, भूक न लागणे किंवा वजनात घट, थुंकीवाटे रक्त, मानेवर गाठी येणे.
हे आहेत उपचार
याआधी इंजेक्शनद्वारे औषध दिले जायचे. त्यामध्ये आजार बरा होण्यास वेळ लागायचा. आता गोळ्या देतात. आजाराच्या पहिल्या टप्प्यावरच निदान झाल्यास रुग्ण ६ महिन्यात बरा होतो. शासकीय आरोग्य केंद्रात क्षयरोगाच्या निदानासाठी थुंकी तपासणी, सीबीनॅट, एक्स-रे तपासणी व उपचार मोफत आहेत. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना क्षयरोग प्रतिबंधक उपचार मोफत केला जातो.
कोणाला संसर्गाची भीती
क्षयरोगीच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती, एचआयव्ही, मधुमेह, कर्करोग व किडनी विकार असलेले रुग्ण, सतत मद्यपान व धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती यांना क्षयरोगाच्या संसर्गाची शक्यता अधिक असते.
काय काळजी घ्याल
गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा. अतिजोखीमग्रस्त व्यक्तींनी गर्दीत जाणे टाळावे. लहान मुलांची काळजी घ्यावी. त्यांच्यात प्रतिकारशक्ती कमी असते. हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.
३ ते १३ ऑक्टोबर : क्षयरुग्ण शोध मोहीम
झोपडपट्टी, दाट वस्तीचा भाग, क्षयरोगींचे प्रमाण जास्त असलेल्या गावात आरोग्य पथकांद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. क्षयरुग्णांचे लवकर निदान व उपचार हा उद्देश यामागे आहे.
मोफत औषधोपचार
रुग्णांचे निदान लवकर करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार केले जात आहेत. गेल्या शनिवारी एकाच दिवसांत १४ रुग्णांचे निदान झाले आहे. उद्यापासून पुढील १० दिवस रुग्ण शोध मोहीम आहे. २०२५ पर्यंत जळगाव जिल्हा क्षयरोग मुक्त करायचा आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांनी दिली.