वाकोद जवळ सरकी घेवून जाणारा १४ टायरांचा ट्रक पलटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:32 PM2018-06-25T14:32:12+5:302018-06-25T14:36:20+5:30
बीड जिल्ह्यातून सरकी घेऊन सेंधवा कडे जात असलेला १४ टायरी ट्रक (क्र. एम. एच. १८ बी. जी.१७७५) उलटून झालेल्या अपघातात गाडीचे नुकसान झाले.
वाकोद, ता. जामनेर - बीड जिल्ह्यातून सरकी घेऊन सेंधवा कडे जात असलेला १४ टायरी ट्रक (क्र. एम. एच. १८ बी. जी.१७७५) उलटून झालेल्या अपघातात गाडीचे नुकसान झाले. हा अपघात जळगाव औरंगाबाद मार्ग क्र.१८६ वरील वाकोद गावाजवळ सोमवार रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास झाला.
जळगाव कडून भरधाव वेगाने येणारा आयशर गाडीला वाचविण्याच्या प्रयत्नत ट्रक पलटी झाल्याचे गाडीच्या किन्नर ने सांगितले. सुदैवाने हा ट्रक रस्त्यावर न पड़ता रस्त्या बाहेर पडल्याने वाहने ये जा करण्यास अडथळा निर्माण झालेला नाही. जळगाव औरंगाबाद महामार्गाचे काम सुरु आहे.दोन्ही बाजूला साइट पट्टयाचे काम सुरु आहे. यात माती व मुरुम भरण्यात येत आहे. पावसाळा सुरु असून पावसाच्या पाण्याने या साइट पट्टया मध्ये पाणी साचुन चिखल तयार होतो. ओव्हर टेक करतांना रस्ता अपूर्ण पड़त असल्याने साइट पट्टया मध्ये वाहने चिखलात फसण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
गुरुवारी जळगाव येथून प्लॅस्टिकच्या खुर्च्या घेऊन औरंगाबादकडे जात असलेला ट्रक उलटून झालेल्या अपघातात खुर्च्यांचे मोठे नुकसान झाले होते. या अपघाता मुळे सकाळी वाहनांची गर्दी वाढत गेल्याने वाकोद पहूर रस्त्यावर तीन ते चार कि.मी. दोन्ही बाजूच्या वाहनाच्या रांगा लागून रहदारीचा खोळंबा झाला होता.