वर्षभरात आढळले 140 क्षयरोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 12:25 AM2017-03-24T00:25:57+5:302017-03-24T00:25:57+5:30
अमळनेर : संसर्गजन्य असला तरी औषधोपचाराने क्षयरोग पूर्णत: बरा होऊ शकतो
धार, ता.अमळनेर : क्षयरोग म्हटला म्हणजे अनेकांना त्याची भीती वाटते. आपल्याकडे क्षयरोग ही सार्वजनिक आरोग्याची समस्या आहे. देशात दररोज क्षयरोगाने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अमळनेर तालुक्यात वर्षभरात 1326 जणांची थुंकी तपासणी केली. त्यात 140 जण क्षयरोगी आढळून आले आहेत. दरम्यान, हा आजार संसर्गजन्य असला तरी तो पूर्णत: बरा होतो, असे ग्रामीण रुग्णालयच्या वैद्यकीय अधिका:यांनी सांगितले.
क्षयरोग हा ‘मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलेसिस’ नावाच्या जिवाणूपासून होत असतो. प्राचीन काळी याला ‘राजयक्ष्मा’ नावाने ओळखले जायचे. क्षयरोग फुफ्फुसांना होत असला तरी तो शरीराच्या लसिकाग्रंथी, मेंदू, हाडे, मूत्रपिंड, यासारख्या अवयवांनाही होऊ शकतो. क्षयरोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. जेव्हा फुफ्फुसाच्या क्षयरोगाने आजारी असणारी व्यक्ती शिंकते, खोकते तेव्हा हवेद्वारे क्षयरोगाच्या जिवाणूचा प्रसार होतो.
अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आरएनटीसीपी सेंटर असून, यामार्फतही उपचार केले जातात. येथील प्रयोगशाळेत ‘एलईडी फ्लोरोसन्स’ हे अत्याधुनिक यंत्र आणण्यात आलेले आहे. या यंत्राद्वारे रुग्णाची थुंकी तपासली जाते. नवीन टेक्नॉलॉजी असल्याने पूर्वीपेक्षा 10 पटीने रिझल्ट चांगले मिळतात. क्षयरोगाचे सूक्ष्म जंतू याद्वारे स्पष्ट दिसतात. गेल्या वर्षभरात 1326 जणांची थुंकी तपासण्यात आली. त्यात 140 जण क्षयरोगी आढळून आले. क्षयरोगींची ग्रामीण रुग्णालयात मोफत तपासणी व उपचार करण्यात येत असतो, असे प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप अहिरराव व क्षयरोग आरोग्य भेटीदाता रमाकांत सैंदाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
क्षयरोग संसर्गजन्य असला तरी, औषधोपचाराने हा आजार पूर्णत: बरा होतो. समतोल आहार, योग्य व्यायाम व पुरेशी विश्रांती याचा अंगीकार केल्यास रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते. क्षयरुग्णास क्षयरोगमुक्त करणे हे आमचे ध्येय आहे.
-डॉ. प्रकाश ताळे,
वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय,