आरोग्य यंत्रणेत १४ हजार बेड रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:47+5:302021-07-20T04:12:47+5:30
आनंद सुरवाडे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ११ हजारापर्यंत गेलेली सक्रिय रुग्णांची संख्या आता गेल्या वर्षभराच्या कालावधीत प्रथमच १०० ...
आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ११ हजारापर्यंत गेलेली सक्रिय रुग्णांची संख्या आता गेल्या वर्षभराच्या कालावधीत प्रथमच १०० वर आली आहे. यामुळे शासकीय यंत्रणेतील साडेचौदा हजारांवर बेड रिक्त झाले आहेत. विशेष बाब म्हणजे जिल्हाभरातील कोविड केअर सेंटर प्रथमच पूर्णत: रिकामी झाली आहेत. यात ऑक्सिजनची मागणीही आता पाच ते सहा टक्क्यांवर आली.
तिसऱ्या लाटेची सुरुवात झाल्याचे एकीकडे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. काही देशांमध्ये ही लाट आहे, मात्र, जळगावात सद्यस्थितीत समाधानकारक स्थिती असून तिसऱ्या लाटेच्या आधीच यंत्रणेतील केवळ ३७ बेड भरलेले आहेत. उर्वरित सर्व बेड रिक्त आहेत. यामुळे आगामी काळात ही दिलासादायक बाब मानली जात आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयांनीही त्यांची कोविड सेंटर सरेंडर केली असून ती बंद करण्यात आली आहेत.
ऑक्सिजनची मागणी घटली
दुसऱ्या लाटेत दिवसाला ८ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन लागत होता. साधारण ११ जम्बो सिलिंडर लागत होते. मात्र, आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६० ते ७० सिलिंडरच ऑक्सिजनची मागणी आहे. ही मागणी पाच टक्क्यांवर आली आहे.
या तारखा महत्त्वाच्या...
१२ सप्टेंबरपासून पहिली लाट ओसरायला सुरुवात
१५ फेब्रुवारीपासून दुसऱ्या लाटेला सुरुवात
१८ एप्रिलपासून दुसरी लाट कमी व्हायला सुरुवात
१९ जुलैला सक्रिय रुग्णांची संख्या १०० वर
तिसऱ्या लाटेत का असू शकतो दिलासा?
पहिल्या व दुसऱ्या लाटेतील पॅटर्न बघितला असताना, सक्रिय रुग्णांची संख्याही जिल्ह्यात ११ हजारांच्या वर गेलेली नाही. पहिल्या लाटेत ही संख्या १० हजारांवर होती. दुसऱ्या लाटेत ११ हजारांवर पोहोचली होती. यानंतर ही संख्या कमी झाली. हाच पॅटर्न दोनही लाटांमध्ये कायम होता. अशा स्थितीत जिल्ह्यातील बेड हे त्यापेक्षा अधिक असल्याने, शिवाय आता ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची संख्या वाढल्याने या बाबी तिसऱ्या लाटेत दिलासादायक ठरू शकतात.
अशी आहे स्थिती...
एकूण बेड १४४६५
सध्या रुग्ण दाखल ३७
रिक्त बेड १४४२८
सेंटरनुसार रिक्त बेड असे
कोविड केअर सेंटर ९६९७
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर ३६३६
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल : १०९५