जळगाव जिल्ह्यात वर्षभरात १४१ शेतकरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:51 AM2018-12-25T11:51:02+5:302018-12-25T11:51:26+5:30
कर्जमाफीनंतरही समस्या कायम
जळगाव : जिल्ह्यात सुमारे ९०० कोटींची कर्जमाफी झाल्याचा दावा शासनाकडून केला जात असताना वर्षभरात तब्बल १४१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. प्रशासनाच्या कमिटीने मात्र त्यापैकी ५१ प्रकरणातच कर्जबाजारीपणाने आत्महत्या केल्याचे मान्य केले आहे.
शासनाकडून जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ९९८ कोटींची कर्जमाफी दिल्याचा दावा केला जात असला तरीही बहुतांश शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालेला नाही. त्यामुळे त्यांना खरीपासाठी कर्जच मिळू शकले नाही. त्या शेतकºयांना नाईलाजाने सावकारांच्या दारी जाण्याची वेळ आली आहे. शेतकºयांना बँक, सोसायट्यांकडून हंगामात व वैयक्तिक कारणासाठी कर्ज न मिळाल्यास त्यांना नाईलाजाने सावकाराकडे हात पसरावा लागतो. बहुतांश शेतकरी गावातीलच अवैध सावकारी करणाºयांकडून कर्ज घेतो.
५१ प्रकरणेच प्रशासनाकडून मान्य
या शेतकरी आत्महत्येच्या १४१ प्रकरणांची जिल्हाधिकाºयांच्या अ ध्यक्षतेखालील समितीने तपासणी करून त्यापैकी केवळ ५१ प्रकरणांमध्ये शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे मान्य करून त्यांच्या वारसांना प्रत्येकी १ लाखाची मदत मंजूर केली आहे. तर ५८ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविली आहत. ३१ प्रकरणे अद्याप प्रलंबित असून केवळ १ प्रकरणाची फेरचौकशी होणार आहे.
सप्टेंबर व नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक आत्महत्या
जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१८ या कालावधीत एकूण १४१ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे घडली असून त्यापैकी सप्टेंबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये सर्वाधिक प्रत्येकी १८ आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. जानेवारीत १२, फेब्रुवारी १२, मार्च ११, एप्रिल ७, मे १३, जून १४, जुलै ४, आॅगस्ट १३, आॅक्टोबर १०, डिसेंबर महिन्यात ९ आत्महत्येच्या घटना घडल्या.