जळगाव जिल्ह्यातील 145 कि.मी. रस्त्यांवर खड्डे कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:32 PM2017-12-17T12:32:01+5:302017-12-17T12:34:52+5:30
ग्रामीण भागातील रस्त्यांची दैना कायम
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 17- खड्डेमुक्त रस्ते करण्याची मुदत 15 डिसेंबर रोजी संपली असली तरी अद्यापही जळगाव जिल्ह्यातील 145 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम अपूर्ण आहे. आतार्पयत झालेल्या कामावर जिल्ह्यात 4 कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली.
फक्त 145 कि.मी. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम अपूर्ण असल्याचा दावा भलेही सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला असला तरी जळगाव तालुक्यासह अनेक तालुक्यांमधील अनेक रस्त्यांची दैना कायम आहे.
राज्य तसेच प्रमुख जिल्हा मार्गावर खड्डे पडून त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 डिसेंबर्पयत खड्डेमुक्त रस्ते करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार जिलत कामांना सुरुवात झाली मात्र अद्यापही ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दैना कायम आहे.
निविदांमधील कामे बाकी
निविदांतर्गत करण्यात येणारी कामे अद्याप अपूर्ण आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जिल्ह्यातील राज्य तसेच प्रमुख जिल्हा मार्ग मिळून एकूण साडेचार हजार कि.मी. लांबीचे रस्ते असून त्यापैकी 2000 कि.मी. रस्त्यांवरील खड्डे याअंतर्गत बुजवायचे होते. 13 डिसेंबर्पयत या 2000 कि.मी. लांबीच्या रस्त्यांपैकी 1750 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येऊन साधारण 90 टक्के काम झाले होते. त्यानंतर दोन दिवसात उर्वरित काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र खड्डेमुक्त मोहिमेपूर्वी काही रस्त्यांचे काम निविदा काढून त्यांचा ठेका देण्यात आलेला होता. त्यामुळे हे काम अद्यापही सुरूच आहे. यामध्ये 145 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविणे बाकी आहे. या संदर्भात ठेकेदारांना हे कामे लवकर मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली.
पावसामुळे पुन्हा काम
खड्डेमुक्तीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यात या कामास सुरुवात झाली. मात्र त्यानंतर पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी खड्डे पुन्हा उघडे पडले. यात एकटय़ा चाळीसगाव तालुक्यात 10 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खडय़ांचे काम पुन्हा करावे लागले, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.
खड्डेमुक्तीसाठी 4 कोटींचा खर्च
खड्डेमुक्ती मोहिमेसाठी जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामांसाठी चार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. खड्डेमुक्ती हा दोन वर्षाचा कार्यक्रम मंजूर असून एका वर्षात तीन टप्प्यात हे काम होणार आहे. त्यानुसार या मोहिमेंतर्गत पहिल्याच टप्प्यात 4 कोटींचा खर्च झालेला आहे.
खड्डेमुक्तीच्या कामांतर्गत बुजविण्यात येणा:यासर्व खड्डय़ांचे काम पूर्ण झाले असून यापूर्वी दिलेल्या निविदांमधील कामे होणे बाकी आहे. यासाठी संबंधित ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. पावसामुळे खराब झालेल्या खड्डय़ांचीही कामे पूर्ण झाली आहेत.
- व्ही.बी. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.