अंगणवाडी बांधकामांसाठी असेल १५ कोटींचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:16 AM2021-02-12T04:16:31+5:302021-02-12T04:16:31+5:30
जळगाव : शासनाकडून वाढीव शंभर कोटींचा निधी मंजूर झाला असून याचे आगामी आठ ते दहा दिवसात नियोजन होणार आहे. ...
जळगाव : शासनाकडून वाढीव शंभर कोटींचा निधी मंजूर झाला असून याचे आगामी आठ ते दहा दिवसात नियोजन होणार आहे. यात शिक्षण आरोग्यासह अंगणवाडी बांधकामासाठी निधी देण्याला प्राधान्य राहणार आहे. यात अंगणवाडी बांधकामांसाठी ५ कोटी रूपयांचा निधी अपेक्षित असून मूळ पाच कोटी असा दहा कोटींचा निधी राहणार असून त्यामुळे १५ कोटींच्या कामांचे महिला व बालकल्याण विभागाकडून करण्यात येणार आहे.
अंगणवाडीच्या निधीतही दुरूस्तीपेक्षा नवीन बांधकामांना प्राधान्य राहणार असल्याचे महिला व बालकल्याण अधिकारी आर. आर. तडवी यांनी सांगितले. गेल्या वर्षी काही अंगणवाड्यांचे दुरूस्तीसाठीच वारंवार प्रस्ताव येत असल्याने या विभागाचा निधी थांबविण्यात आला होता. त्यामुळे यंदा हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती आहे. आगामी आर्थिक वर्षासाठी हे नियोजन राहणार आहे. दरम्यान, वाढीव शंभर कोटींच्या निधीत आरोग्य केंद्र तसेच शाळा दुरूस्तीसाठीही तरतूद राहणार आहे. निधी मिळतो मात्र, त्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाकडून होत नसल्याचे चित्र आहे.