गिरणा नदीवरील १५ कोटींचा रेल्वेपूल अडकला तांत्रिक समस्येत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:30 PM2019-07-13T12:30:31+5:302019-07-13T12:31:02+5:30

दीड वर्ष उलटूनही गाड्या धावताहेत धीम्या गतीने

15 Crore rail bridge on Girna river in technical difficulties | गिरणा नदीवरील १५ कोटींचा रेल्वेपूल अडकला तांत्रिक समस्येत

गिरणा नदीवरील १५ कोटींचा रेल्वेपूल अडकला तांत्रिक समस्येत

Next

जळगाव : भुसावळ-सुरत रेल्वे लाइन वरील जळगाव-पाळधी दरम्यान गिरणा नदीवर बांधण्यात आलेला रेल्वेपूल मोठ्या तांत्रिक समस्येत अडकला आहे. या पूलाच्या पुर्णत्वास दीड वर्ष होऊनही आजदेखील प्रत्येक गाडी पूलावरुन जात असताना काही समस्या उद्भवू नये म्हणून कमी वेगाने धावत आहे.
सुरत-भुसावळ रेल्वे लाइनच्या दुहेरीकरणात सुमारे १५ कोटी खर्च करुन गिरणा नदीवर गर्डरयुक्त रेल्वे पूल बांधण्यात आला. ३ नोव्हेंबर २०१७ रोजी या पूलाचे रेल्वे सुरक्षा आयोगाकडून (सीआरएस) परिक्षण करुन उपयोगासाठी खुला करण्यात आला. मात्र त्याचवेळी हस्तांतरण करताना या पूलावरुन प्रत्येक गाडीला २० किमी प्रतितासाची वेग मर्यादा लादण्यात आली. आज दीड वर्ष होऊनही तिच वेग मर्यादा कायम आहे.
जळगावहून सुरतकडे जाण्यासाठी रोज या मार्गाने पॅसेंजर आणि मालगाड्या अशा एकूण ६० रेल्वे गाड्या जात असतात. जळगाव स्थानकाहून गाडी जेव्हा निघते तेव्हा साधारण वेग असतो. मात्र जेव्हाही गिरणा नदीचा पूल जवळ येतो तेव्हा प्रत्येक गाडीचा वेग कमी होऊन फक्त १० ते १५ किमी प्रतितासाच्या वेगाने गाडी धावते.
याबाबत जळगाव स्टेशन प्रबंधक संजयकुमार रॉय यांना विचारले असता तांत्रिक समस्येच्या कारणाने रेल्वे सुरक्षेच्या हेतूने प्रत्येक गाडीला या ठिकाणी जाताना वेग मर्यादा लादण्यात आली असल्याचे सांगितले.
या पूलाबाबत अधिक माहिती काढली असता खूपच मोठी तांत्रिक समस्या असल्याचे निष्पन्न होत आहे. कारण ज्यावेळी रेल्वे सुरक्षा आयोगाकडून या पुलाचे परिक्षण करण्यात आले त्यावेळी पूल उभारणीत काही त्रुटी आढळल्या आणि त्या कारणाने त्याच वेळी गाड्यांची वेग मर्यादा २० किमी प्रतितास असावी अशा सूचना देण्यात आल्या. शिवाय त्याच वेळी विभागीय कार्यालय, मुंबई कडून मापदंड लावून अहवाल बनवून रेल्वेची संशोधन डिझाइन आणि मानक संस्था (आरडीएसओ) लखनऊ येथे पाठविण्यात आला आहे, मात्र सदर पूल उभारणीत कोणती तांत्रिक समस्या आहे याबाबत अजूनही खुलासा आलेला नाही.

सीआरएस झाल्यानंतर सदर पूल हस्तांतरण करण्यात आला तेव्हापासूनच वेग मर्यादा लादण्यात आली आहे. मात्र कोणत्या तांत्रिक समस्येने वेग मर्यादा आखण्यात आली आहे, याबाबत आम्हाला काहीही सांगण्यात आलेले नाही.
-संजयकुमार गुप्ता, वरिष्ठ विभागीय अभियंता (प.रे.)

सदर पूलावर तांत्रिक समस्येच्या कारणाने प्रत्येक गाडीस वेग मर्यादा दिली आहे. शिवाय हा सुमारे ३५० मीटरचा महत्त्वपूर्ण पूल असून मापदंडाचा अहवाल लखनऊ येथे पाठविण्यात आला आहे. तेथून अजून खुलासा आलेला नसून खुलासा आल्यानंतर वेग निर्बंध हटविण्यात येईल.
- संजय त्यागी, बांधकाम कार्यकारी अभियंता, नंदुरबार

Web Title: 15 Crore rail bridge on Girna river in technical difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव