१५ दिवसात ॲक्टीव्ह रुणांची संख्या १४५० ने घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 10:19 PM2021-05-03T22:19:19+5:302021-05-03T22:21:46+5:30
जिल्हाधिकारी : बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्याची वाढती संख्या जळगाव : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ...
जिल्हाधिकारी : बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्याची वाढती संख्या
जळगाव : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून गेल्या १५ दिवसात जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्याही १४५० ने कमी झाली असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
३४४ वरून ११८२१ पर्यंत
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस अवघे ३४४ ॲक्टीव्ह रुग्ण होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन फेब्रुवारी अखेर ही संख्या २५०५ वर पोहोचली. मार्चअखेर जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या तब्बल ११८०३ वर गेली होती. तर १३ एप्रिल रोजी जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रुगणांची संख्या ११८२१ या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येताच जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्ण शोध मोहिम राबविली. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोध घेऊन संशयित व्यक्तींच्या चाचण्याही मोठ्या प्रमाणात वाढविल्या. त्वरीत निदान, त्वरीत उपचारसह जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविल्याने गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्या वाढत आहे.
कोरोना संपलेला नाही, सूचनांचे पालन करा
मागील १५ दिवसात जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या १४५० ने कमी होऊन ती १०३७१ पर्यंत खाली आली आहे. ही जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बाब आहे.असे असले तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे जिल्हावासियांनी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करुन कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करुन निर्बधांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.