जळगावात पपईची वाहतूक करणारा ट्रक उलटला; १५ मजुरांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 07:39 AM2021-02-15T07:39:25+5:302021-02-15T10:16:36+5:30
Jalgaon Accident: जळगावातील यावल तालुक्यात ट्रकला अपघात; मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जळगाव : तालुक्यातील अभोडा, केर्हाळे, विवरे,रावेर येथील हातावर पोट असलेले मजूर बायका पोरांसह धुळे जिल्ह्य़ातील शहादा तालूक्यात पपई भरून आणण्याच्या हातमजुरीसाठी नेहमी प्रमाणे गेले असता क्रूर काळाने झडप घातल्याने एक दाम्पत्य, तीन कुटूंबातील मायलेकी व मायलेकांसह ११ जण अभोडा येथील तर दोन रावेर तर केर्हाळे व विवरे येथील एकेक जण असे १५ जण पपईने भरलेला ट्रक किनगावनजीक उलटून आज पहाटे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सर्वत्र हाहाकार उडवणाऱ्या या घटनेने अभोडा, विवरे, केर्हाळे व रावेर शहरासह तालूक्यात एकच शोककळा पसरली आहे.
धुळे जिल्ह्यातील शहादा येथे पपई भरून आणण्याच्या हातमजूरीसाठी गेलेल्या तालुक्यातील हे मजूर रविवारी ट्रकमध्ये पपई भरून रावेरला आणत असताना क्रूर नियतीने झडप घालून यावल तालुक्यातील किनगावजवळ बऱ्हाणपूर - अंकलेश्वर राज्य महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने अभोडा येथील एकाच आप्तपरिवारातील ११ जणांवर झडप घातल्याने अभोडा गावावर शोककळा पसरली.
मृतांमध्ये अशोक जगन वाघ (वय ४०), संगिता अशोक वाघ (वय २५) या दाम्पत्यासह त्यांची लहानगा मुलगा सागर अशोक वाघ (वय ०३ वर्षे)व नरेंद्र वामन वाघ (वय २५) हे एकाच परिवारातील चार सदस्य कमलाबाई रमेश मोरे (वय ४५) यांची शारदा रमेश मोरे (वय १५) व गणेश रमेश मोरे (वय ०५) वर्षे ही दोन्ही मुल मुली , संदीप युवराज भालेराव (वय २५) व दुर्गाबाई संदीप भालेराव (वय २०) हे दाम्पत्य, सबनूर हूसेन तडवी (वय ५३) व दिलदार हुसेन तडवी (वय २०) हे मायलेकांसह रावेर येथील शेख हुसेन शेख मण्यार फकीरवाडा रावेर, डिगंबर माधव सपकाळे वय ५५ रावेर, केर्हाळे येथील सर्फराज कासम तडवी वय ३२ व संदीप युवराज भालेराव विवरे अशी १५ जण जागीच ठार झाल्याने एकच शोककळा पसरली असून, अभोडावासीयांची साखरझोपेतील झोप उडाली असून मुखशुद्धीसह चहापाणीसाठी आज पहाटे गावात एकही चूल पेटली नाही.