धरणाचे १५ गेट उघडल्याने बोरीला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 10:20 PM2020-07-25T22:20:24+5:302020-07-25T22:20:52+5:30
काही गावांचा संपर्क तुटला
पारोळा : तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरणाच्या वरील भागात मुसळदार पाऊस झाल्याने बोरी नदीला मोठा पूर आला. यामुळे धरणाने २६६.८० मीटरची धोक्याची पातळी ओलांडल्याने धरणाचे १५ गेट उघडण्यात आले. धरणातून ९ हजार २५ क्यूसेस पाणी नदीत सोडले आहे. यामुळे बोरी नदीला मोठा पूर आला असून या पुरामुळे काही गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.
या पुराच्या पाण्यात नदी काठची व पात्रातील मंदिरे पाण्याखाली आली आहेत. प्रचंड पाण्याचा प्रवाहाने मोंढाळे पिंप्री या गावाजवळील साठवण बंधाऱ्याचा भराव वाहून गेला. तर पारोळा शहराला पाणी पुरवठा करणारे विचखेडे येथील पंप हाऊसला पुराच्या पाण्याचा वेडा पडला आहे.
२४ च्या सायंकाळी बोरी धरणाच्या वरील भागात मालेगाव , निमगूळ ,नासिक आदी ठिकाणी मुसळदार पावसाने हजेरी लावल्याने वरूनच बोरी नदीला मोठा पूर आला व बोरी धरणाने काही मिनिटात धोक्याची पातळी ओलांडली यामुळे २४ च्या रात्री १२.४५ वाजता धरणाचे ९ दरवाजे ०.१५ मीटरने उघडून ४ हजार ५९ क्यूसेस विसर्ग नदी पात्रातुन सोडण्यात आला.
यानंतर बोरी धरणाची धोक्याची पाणी पातळी २६६.८५ मीटर पर्यंत आल्याने रात्री १ वाजता धरणाचे ११ दरवाजे ०.१५ मीटरने उघडून ४ हजार ९६१ क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरू झाला.
रात्री १.३० वाजत धरणाचे १३ दरवाजे ०.१५ मी ने उघडून ५ हजार ८६३ क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरु झाला.
रात्री २ वाजता बोरी धरणाची पाणी पातळी २६६.९२ मीटर पाणी पातळी वाढली. तेव्हा धरणाचे १५ दरवाजे ०.१५ मीटरने ने उघडून ६ हजार ७६५ क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरु झाला.
धरणाच्या वरील भागात पाण्याचा प्रवाह खूप जोरात सुरू असल्याने शेवटी रात्री ३ वाजता धरणाचे १० दरवाजे ०.१५ मी व ५ दरवाजे ०.३० मीटरने ने उघडून ९ हजार २५ क्यूसेस मोठा पाण्याचा प्रवाह नदी पात्रात सोडण्यात आला. बोरीला रात्री ३ वाजता मोठा पूर आला. या पाण्याचा प्रचंड प्रवाहाने नदी वरील मोंढाले पिंप्री गावा जवळील साठवण बंधाºयाच्या बाजूचा भराव वाहून गेला.
अनेक गावांचा संपर्क तुटला
गेल्या ३ ते ४ वर्षा नंतर एकाच रात्रीत धरणाचे १५ गेट उघडण्याची ही पहिली वेळ आहे. नदीला रात्रीतून पूर आल्याने नदी काठच्या गावातील ग्रामस्थांनी पहाटे उठल्या बरोबर पूर पाहिल्याने आश्चर्य व्यक्त करीत सवार्ना नवल वाटले. बोरी नदीला पूर आल्याने तामसवाडीचा बोळे ,निमगुळ व धुळे या गावांशी संपर्क तुटला. तर टोळी गावालगत नदी पात्रातील विठ्ठलाचे मंदिराला पाण्याचा वेढा पडला.
याचबरोबर मोंढाळे व पिंप्री प्र. उ. या दोन गावांचा संपर्क तुटला. पिंप्री प्र. उ. गावाचे नदी काठचे महादेवाचे मंदिर पाण्या खाली आले. पुढे पुलावरुन पाणी वाहत असल्याने बहादरपुर, महाळपूर व शिरसोदे गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला असून सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच भिलाली व बहादरपूर, अमळनेर या गावांचाही संपर्क तुटला आहे.
पंप हाऊसला पाण्याचा वेढा
पारोळा शहराला पाणी पुरवठा करणारा पंप हाऊस हा विचखेडे गावा नजीक बोरी नदीच्या काठाला आहे. नदीला प्रचंड पूर असल्याने पंप हाऊसला पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. त्यामुळे पंप हाऊसचा संपर्क तुटल्याने पंप हाऊस बंद पडले आहे. यामुळे आता शहराला होणारा पाणी पुरवठा एक दिवसाने उशिराने होणार आहे.