२४ पैकी १५ तास ड्युटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:27 AM2021-02-06T04:27:20+5:302021-02-06T04:27:20+5:30
१) नरेंद्र वारुळे यांनी सांगितल्यानुसार सकाळी ९ वाजता कार्यालयात यावे लागते. दुपारी ४ वाजता घरी जेवणासाठी गेल्यावर ३० मिनिटात ...
१) नरेंद्र वारुळे यांनी सांगितल्यानुसार सकाळी ९ वाजता कार्यालयात यावे लागते. दुपारी ४ वाजता घरी जेवणासाठी गेल्यावर ३० मिनिटात पुन्हा कार्यालयात कामकाज व रात्री ९ वाजता घरी गेल्यावर जेवण झाले की पुन्हा ९.३० वाजता कामावर येऊन रात्री १.३० ते २ वाजेपर्यंत कामकाज चालते.
२) कार्यालयीन कामकाज करीत असताना घरी कुटुंबासाठी फक्त अधूनमधून एक तास मिळतो. रात्री दोन वाजता घरी गेल्यावर पत्नी व मुले झोपलेले असतात. त्यातही रात्री-अपरात्री काही घटना घडली तर लगेच घटनास्थळावर पळावे लागते. कुटुंबासाठी रोजचे तर सोडाच सणासुदीलादेखील वेळ देता येत नाही.
३) मुलगी जागृती पदवीच्या शेवटच्या वर्षाला, प्राची १२ वीला तर मुलगा ८ वीत शिक्षण घेत आहेत. मुले साधारण शाळेत शिक्षण घेत आहेत. चांगल्या शाळेत किंवा उच्च शिक्षण घेण्याइतपत परिस्थिती नाही. तीन मुले, वृद्ध आई,वडील यांचे पोट भरण्यासह दवाखाना, शिक्षण व दैनंदिन गरजांमध्येच पगार अपूर्ण पडतो.
४) आजही पोलीस लाईनीतच वास्तव्याला असून शहरात स्वत:चे असे घर होऊ शकलेले नाही. कुटुंबाला हातभार लागावा यासाठी मुली शिक्षण करून घरातच शिवणकाम करून मदत करतात. अमळनेर येथे वडिलोपार्जित जुने घर आहे. तेथे आई व वडील राहतात, त्यांचा दवाखाना, संसारात लागणाऱ्या वस्तू पुरवितांना कसरत होते.
कोट...
पतीच्या पगारात मुलांचे शिक्षण, घर खर्च, सासू-सासऱ्यांचा घरखर्च, दवाखाना या गोष्टी करताना खूप कसरत होते. इतरांसारखे महागडे कपडे, वाहने हे फक्त एक स्वप्नच आहे. पती पोलिसात असल्याचा अभिमान आहे, परंतु कुटुंबाला वेळ देऊ शकत नसल्याचे दु:ख आहे. दवाखान्याची वेळ येते तेव्हा नातेवाइकांकडून पैसे घ्यावे लागतात. ते फेडताना नंतर नाकीनऊ येते.
-जागृती नरेंद्र वारुळे
जिल्ह्यातील पोलीस : ३२३४
शासकीय घरे मिळालेले पोलीस : २९७१