दहा दिवसांच्या बाळासह १५ जण निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 12:36 PM2020-05-06T12:36:55+5:302020-05-06T12:37:44+5:30
दिलासा : समता नगरातील १५ जणांना सोडले घरी; परिसरात सील कायम
जळगाव : समता नगरात बाधित महिलेच्या संपर्कातील तिच्या दहा दिवसांच्या बाळासह १५ जणांचे कोरोना तपासणी अहवाल मंगळवारी सायंकाळी निगेटीव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे़ तीन दिवसांपासून हे १५ जण शाहू महाराज रुग्णालयात क्वॉरंटाईन होते़
बुलडाणा जिल्ह्यातील २१ वर्षीय विवाहिता समतानगरात तिच्या माहेरी आलेली असताना तिला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल २ मे रोजी प्राप्त झाला होता़ या महिलेला दहा दिवसाचे बाळ असल्याने त्याच्यासह नातेवाईक व हायरिस्क कॉण्टॅक्ट अशा १५ जणांना त्याच दिवशी शाहू महाराज रुग्णालयात क्वॉरंटाईन करण्यात आले होते़
वडिलांचा अहवाल पॉझिटीव्ह
हायरिस्क संपर्कांमध्ये या महिलेचे वडील, बाळ व १५ जणांचा समावेश होता़ त्यांना शाहू महाराज रुग्णालयात दाखल केल्यानंतर तपासणीसाठी कोरोना रुग्णालयात आणण्यात आले होते़ वडिलांचे अहवाल सोमवारीच रात्री प्राप्त झाले होते़ त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना कोरोना कक्षात हलविण्यात आले़ त्यानंतर मंगळवारी अन्य संपर्कातील लोकांचे अहवाल प्राप्त झाले़ त्यांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत़
संपर्कातील लोकांची शोधा-शोध
बाधित रुग्णांकडून किंवा त्यांच्या संपर्कातील व्यक्तिंकडून वेळेवर योग्य माहिती समोर येत नसल्याने आरोग्य यंत्रणेचीही तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे़ संपर्कातील लोकांचा शोध घेण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे़ बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोक समोर येत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे़ सम्राट कॉलनी परिसरातच सतत तीन दिवस वैद्यकीय पथकाला हे शोधकाम करावे लागले़
सम्राट कॉलनीतील ३० जण क्वॉरंटाईन
सम्राट कॉलनीतील बाधित तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर या परिसरातील त्याच्या संपर्कातील ३० जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे़ त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत़ समता नगर व सम्राट कॉलनी परिसरात महापालिका वैद्यकीय पथकाने सर्वेक्षणाचे काम सुरू केलेले आहे़ परिसर ठरवून दिलेला असून त्यातील प्रत्येक घरात जाऊन कोणाला काही लक्षणे आहेत का याची तपासणी वैद्यकीय पथकामार्फत केली जात आहे़ अद्याप कोणाला तशी काही लक्षणे नसल्याचे समोर आले आहे़