महूखेडा येथे 15 जणांना डायरीयाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 04:32 PM2017-09-02T16:32:12+5:302017-09-02T16:41:05+5:30
दूषित पाणी पुरवठा : ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात ; मंत्री महाजन यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष
ऑनलाईन लोकमत
जामनेर,दि.2 - तालुक्यातील महुखेडा येथे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने गावात 15 जणांना डायरीयाची लागण झाली आहे. तीन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी स्वच्छता अभियान राबविण्याबाबत केलेल्या सुचनेकडे दुर्लक्ष होत आहे.
मुंदखेडे हे गाव गारखेडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत आहे. डॉ. सूर्यवंशी यांनी गावांत येवून रुग्णांची प्राथमिक तपासणी करीत रुग्णांची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायतीला दूषित पाणी पुरवठा थांबविण्याबाबत पत्र देण्यात आले. मात्र ग्रा.पं. पदाधिकारी यांनी कोणतीही दखल न घेतल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे.
गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य
पंचायत समिती व आरोग्य विभागाने दखल न घेतल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. शनिवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने गावात भेट देवून पाहणी केली असता सर्वत्र घाणीचे साम्राज्य आढळून आले. नवीन प्लॉट भागात तसेच सार्वजनिक शौचालयाचे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याची स्थिती होती.
गावाजवळ महुखेडा धरण आहे. या ठिकाणी मुबलक पाणी साठा आहे. मात्र मंजुर झालेली भारत निर्माण योजना ठेकेदाराने पुर्ण न केल्याने ग्रामस्थांना बोरींगचे पाणी प्यावे लागत आहे.
गावात सर्वत्र अस्वच्छता असल्याने दरुगधी आहे. दूषित पाणी पुरवठय़ामुळे गावातील नागरिकांना अतिसाराची लागण झाली आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने लक्ष द्यावे.
- लक्ष्मण गायकवाड, ग्रामस्थ.
मंत्री गिरीष महाजन यांनी सूचना देवून देखील ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत आहे. गावात नियमित साफसफाई होत नसल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
-विजय पाटील, ग्रामस्थ.
गावात जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छतेला सुरुवात केली आहे. रुग्णांवर उपचार सुरु असुन नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित आहे.
-उषा मानसिंग पवार, सरपंच, महुखेडा