खासदारांनी दिलेले १५ व्हेंटिलेटर गायब, भाजप-सेना आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 11:15 PM2021-04-01T23:15:13+5:302021-04-01T23:15:34+5:30
खासदार रक्षा खडसे यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयास उपलब्ध करुन दिलेले १५ व्हेंटिलेटरची दुसरीकडेच विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी त्यांनीच उघडकीस आणला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : खासदार रक्षा खडसे यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयास उपलब्ध करुन दिलेले १५ व्हेंटिलेटरची दुसरीकडेच विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी त्यांनीच उघडकीस आणला. हे व्हेंटिलेटर दोन दिवसात परत आणण्याच्या सक्त सूचना खासदारांनी जिल्हा शल्यचिकित्सकांनी केली. चोपडयातील वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रश्न भाजप व शिवसेना आमने- सामने आल्याचे पहायला मिळाले.
चोपडा तालुक्यात कोरोन रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा बैठक झाली. अध्यक्षस्थानी खासदार खडसे होत्या.
भाजपने काही समस्या चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेने प्रशासनाची बाजू सावरुन धरली. यामुळे दोन्ही बाजूचे पदाधिकारी आमने- सामने आल्याचे चित्र होते.
बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, प्रांताधिकारी सीमा अहिरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुमित शिंदे उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लातूरकर यांनी कोविडची परिस्थिती विशद केली.
नगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ चंद्रकांत बारेला यांनी शहरात २८ टीम द्वारे सर्वेक्षण सुरू असून शिबिरे घेणे सुरू असल्याचे सांगितले.
बैठकीत भाजपाचे पंकज पाटील, गजेंद्र जयस्वाल, नरेंद्र पाटील, प्रकाश पाटील, दीपक पाटील, आत्माराम म्हाळके तर शिवसेनेचे नरेश महाजन, राजेंद्र पाटील, विकास देशमुख, राजाराम पाटील यांनी चर्चेत सहभाग घेत जाब विचारला.
तहसीलदार अनिल गावित, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे , नायब तहसीलदार राजेश राऊळ, गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे, उपजिल्हा रुग्णालय प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील, डॉ. गुरुप्रसाद वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर, नगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला यासह अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
गाव पातळीवर जास्तीत जास्त चाचण्या
चोपडा शहरात एकूण सहा खाजगी हॉस्पिटलमध्ये ४४६रुग्ण उपचार घेत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात एकूण सात प्राथमिक आरोग्य केंद्रे असून ३८ उपकेंद्रे आहेत. गाव पातळीवर जास्तीत जास्त दररोज सुमारे तीनशे टेस्टिंग करत असल्याचे सांगितले. आतापर्यंत ग्रामीण भागात १९ हजार ४४ व शहरी भागात १० हजार ६१६ टेस्टिंग झाल्याचे स्पष्ट केले .