कोरोनाच्या संकटात पालिकेला दिले १५० ते २०० टन लाकूड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:17 AM2021-05-09T04:17:21+5:302021-05-09T04:17:21+5:30
फोटो : 7.23 वाजेचा मेल.... लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे मृत्यूची झालेली वाढ पाहता जळगाव शहराच्या स्मशानभूमीत गरजू ...
फोटो : 7.23 वाजेचा मेल....
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे मृत्यूची झालेली वाढ पाहता जळगाव शहराच्या स्मशानभूमीत गरजू व निराधारांना अंत्यविधीसाठी लाकडे कमी पडू नये यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने परिसरातील अवजड व जळाऊ लाकडे जळगाव महानगरपालिकेकडे मोफत सुपूर्द केली आहेत. अंदाजे ही १५० ते २०० टन लाकडे असण्याची शक्यता असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
कोरोनाच्या या उदभवलेल्या सद्यस्थितीत स्मशानभूमीत लाकडे कमी पडू नयेत यासाठी प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांच्या पुढाकाराने विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने विद्यापीठ परिसरातील जळाऊ लाकडे महानगरपालिकेकडे मोफत सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाच्या ६५० एकरच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यातील कोसळलेली किंवा वाळलेली झाडे एकत्रित करुन ठेवली होती. त्यामध्ये निम, गुलमोहर, सुबाभूळ, निलगिरी तसेच काही काटेरी वृक्षांचा समावेश आहे. जळगाव महानगरपालिकेशी विद्यापीठाने पत्रव्यवहार केला व स्मशानभूमीच्या दैनंदिन कामासाठी ही लाकडे मोफत देण्याची तयारी दर्शविली. महानगरपालिकेनेही त्याला प्रतिसाद दिला व त्यानुसार महानगरपालिकेच्या वाहनाने ही लाकडे उचलण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
महापौर, उपमहापौरांची विद्यापीठाला भेट
शनिवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सतिश कुलकर्णी, माजी महापौर तथा सिनेट सदस्य विष्णू भंगाळे यांनी विद्यापीठाला भेट दिली व विद्यापीठ प्रशासनाला आभाराचे पत्र दिले. संकटाच्या काळात विद्यापीठाने पुढाकार घेऊन सामाजिक ऋण म्हणून मोफत लाकडे पुरविल्याबद्दल महापौर व आयुक्तांनी विद्यापीठाचे आभार मानले. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ.एस.आर. भादलीकर, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहिल, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील, विद्यापीठ अभियंता आर.आय.पाटील, कनिष्ठ अभियंता पी.टी.मराठे, उद्यान अधीक्षक अश्विनी पाटील आदी उपस्थित होते.
सध्या कोरोनाच्या काळात मृतांची संख्या वाढली असून स्मशानभूमीत लाकडे कमी पडू नयेत यासाठी विद्यापीठाने जळगाव महानगरपालिकेला ही सर्व लाकडे मोफत देण्याचा निर्णय घेतला. हे विद्यापीठ संकटाच्या काळात समाजाच्या मदतीला नेहमीच घावून जात असते. तोच पायंडा यावेळी देखील कायम ठेवण्यात आला.
- प्रा.डॉ.ई.वायुनंदन, प्रभारी कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ