टिटवी येथील दीडशे वर्षांची रामलीला परंपरा प्रथमच होणार खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 03:16 PM2020-04-26T15:16:45+5:302020-04-26T15:18:49+5:30
टिटवी, ता.पारोळा येथे गेल्या दीडशे वर्षापूर्वी अक्षयतृतीयाच्या दुसºया दिवसापासून तीन दिवसीय रामलीला व महाभारत ही सजीव स्वरुपात सादर करण्यास सुरुवात केली होती. परंतु कोरोनामुळे या परंपरेला खंड पडला आहे.
भास्कर पाटील
महिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या टिटवी, ता.पारोळा येथे गेल्या दीडशे वर्षापूर्वी बळीराम पांडू पाटील व भीमजी बाबा यांनी गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी अक्षयतृतीयाच्या दुसºया दिवसापासून तीन दिवसीय रामलीला व महाभारत ही सजीव स्वरुपात सादर करण्यास सुरुवात केली होती. यातून समाज प्रबोधनही करण्यात येत होते. ही लोककला आजतागायत अखंड सुरू होती. परंतु जगभर कोरोनाचे तांडव सुरू असल्यामुळे या परंपरेला खंड पडला आहे.
जुन्या काळी ग्रामीण भागात मनोरंजनाची साधने नसल्यामुळे ग्रामीण भागात रामलीला, महाभारत, शिवाजी महाराज यांच्या शौर्य कथा अशा अनेक कथा हुभेहुभ सादर करून श्रोत्यांचे मनोरंजन करायचे. कालांतराने मनोरंजनाची साधने उपलब्ध झाल्यामुळे व दूरदर्शनवर रामायण, महाभारत कथा प्रसारित झाल्यामुळे अनेक गावात या जिवंत कलेकडे श्रोत्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे ही लोककला लोप पावली आहे.
परंतु पारोळा तालुक्यातील टिटवी गाव अपवाद आहे. येथील मधुकर केशव पाटील, मधू न्हावी, शांताराम पाटील या वृद्ध कलावंतांनी आजपर्यंत ही कला तरुणांच्या माध्यमाने जिवंत ठेवली आहे. आजही गावातील कलावंत आपल्या भूमिका हुभेहुभ सादर करतात व श्रोत्यांना रात्रभर खिळवून ठेवतात. त्यात मारोती-उदय पाटील, राम-छोटू महाजन, लक्ष्मण-राजेंद्र पाटील, सीता- जितू पाटील, रावण-सुधाकर महाजन असे अनेक कलावंत पूर्ण रामायण, महाभारत कथांच्या भूमिका विज्ञान युगातही सदर करतात. विशेष म्हणजे हे खेडूत कलावंत कुठे प्रशिक्षण न घेता ही कला सदर करतात.
कलाकारांची ही कला पाहण्यासाठी बाहेरगावी कामानिमित्त गेलेले व नातेवाईक व परिसरातील श्रोतेही मोठ्या संख्येने उपस्थित व्हायचे. मात्र दीडशे वर्षांची ही परंपरा ‘कोरोना’मुळे खंडित होणार आहे.