५०० मीटरसाठीही ॲम्ब्युलन्सचे १५०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:15 AM2021-04-17T04:15:09+5:302021-04-17T04:15:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून ॲम्ब्युलन्स आणि त्यातही ऑक्सिजन असलेल्या ॲम्ब्युलन्सची मागणी सातत्याने वाढत आहे. रुग्णांना ...

1500 for an ambulance even for 500 meters | ५०० मीटरसाठीही ॲम्ब्युलन्सचे १५०० रुपये

५०० मीटरसाठीही ॲम्ब्युलन्सचे १५०० रुपये

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून ॲम्ब्युलन्स आणि त्यातही ऑक्सिजन असलेल्या ॲम्ब्युलन्सची मागणी सातत्याने वाढत आहे. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे किंवा हॉस्पिटलमधून सीटीस्कॅन व अन्य तपासण्या करण्यासाठी इतर ठिकाणी नेणे यामुळे ॲम्ब्युलन्सची मागणी वाढली आहे. जशी मागणी वाढली त्यासोबतच ॲम्ब्युलन्स चालकांची मनमानीदेखील वाढली आहे. जळगाव शहरात फक्त अर्धा किमी अंतरासाठी ॲम्ब्युलन्स चालक दीड ते दोन हजार रुपये आकारत आहेत. तसेच जळगाव ते पारोळा या ५५ किमी अंतरासाठी पाच हजार रुपये आकारले जात आहेत. जर प्रति किलोमीटरच्या हिशेबाने दर हवे असतील तर त्यासाठी १ हजार किमीपेक्षा जास्त अंतर रुग्णवाहिका गेली पाहिजे.

जळगाव शहरात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. शहरात दररोज शेकडो रुग्णांना ने - आण करावी, लागते. त्यात रुग्णवाहिकेच्या शोधात असलेले रुग्णाचे नातेवाईक तर हतबल होतात. ॲम्ब्युलन्स सेवा देणाऱ्या व्यावसायिकांनी ऐन कोरोनाच्या संकटात मोठ्या प्रमाणात दर वाढवले आहेत. शहरात कुठेही जायचे असेल तर त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईकदेखील मेटाकुटीला आले आहेत.

बसस्थानक ते प्रताप नगर

जळगाव शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका रुग्णालयातून प्रताप नगरातील सीटी स्कॅन सेंटर पर्यंत जाण्यासाठी ऑक्सिजन असलेली रुग्णवाहिका हवी असेल तर त्यासाठी १५०० ते दोन हजार रुपये आकारले जातात. त्यासोबतच शहरात कुठेही रुग्णवाहिका हवी असेल तर हेच दर आहेत. बसस्थानक ते प्रताप नगर हे अंतर फक्त ५०० ते ६०० मीटर आहे.

पारोळा ते जळगाव

पारोळा ते जळगाव शहरातील रुग्णालयात रुग्णाला आणण्यासाठी चार लीटर ऑक्सिजन क्षमता असलेली रुग्णवाहिका हवी असेल तर त्यासाठी पाच हजार रुपये लागतात. रुग्णाच्या नातेवाईकाने या दरात घासाघीस केली तर साडेचार हजार रुपयांपर्यंत पैसे लागतात. आणखी सहा लीटरची ऑक्सिजन क्षमता हवी असलेली रुग्णवाहिका हवी असेल तर त्याचे दर वेगळे आहेत.

तक्रार कुठे करायची

खासगी ॲम्ब्युलन्स चालकांनी मनमानी दर आकारल्यानंतर त्याची तक्रार करायची तरी कुठे, असा प्रश्न आहे. खासगी ॲम्बुलन्स चालक अगदी अर्धा किमी अंतरासाठीही दीड ते दोन हजार रुपये आकारत आहेत. यात रुग्णाच्या नातेवाईकांची लुबाडणुक होत आहे.

Web Title: 1500 for an ambulance even for 500 meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.