आयएमएच्या बंदमध्ये जळगाव जिल्ह्यातील 1500 डॉक्टर सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:53 PM2018-01-02T12:53:13+5:302018-01-02T12:55:21+5:30
रुग्णसेवेवर परिणाम
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 02- केंद्र सरकार मंगळवारी लोकसभेत नॅशनल मेडिकल कौन्सील (एनएमसी) नावाचे विधेयक सादर करणार असून या विधेयकाला ‘आयएमए’च्या कृती समितीने विरोध केला आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातील 1500 खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले असून याचा रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपयर्ंत वैद्यकीय सेवा बंद राहणार असून डॉक्टरांच्यावतीने हा काळा दिवस म्हणनू पाळला जात आहे.
सध्या वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी लागणारी परवानगी, नियम, अटी काढून या विधेयकामुळे कोणालाही खासगी मेडिकल कॉलेज सुरु करता येईल. त्यामुळे फक्त वैद्यकीय महाविद्यालयातील 40 टक्के जागांवर सरकारचे नियंत्रण असेल, 60 टक्के जागांसाठी प्रवेश शुल्क निश्चित करण्याचे अधिकार खाजगी मेडिकल कॉलेजच्या संचालकांना मिळणार आहे. त्यामुळे मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमातीच्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थी वैद्यकिय शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.या विधेयकामुळे एनएमसीमध्ये फक्त पाच राज्यांना प्रतिनिधीत्व मिळणार असून 24 राज्यातील मुलभूत हक्कांवर गदा येणार आहे. वैद्यकीय विद्यापीठांना प्रतिनिधीत्व न देता प्रत्येक राज्यातील फक्त एका प्रतिनिधीला सल्लागार मंडळामध्ये प्रतिनिधीत्व मिळेल.
हे विधेयक गरीब व्यक्तींच्या विरोधात असून श्रीमंत व्यक्ती व खासगी व्यवस्थापनासाठी पूरक आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवा या महाग होणार असून खर्चात प्रचंड प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. हे विधेयक अवैज्ञानिक पद्धतीने सर्व पॅथीच्या एकत्रीकरणाला चालना व प्रोत्साहन देणारे आहे. भारतातील वैद्यकीय पदवीधरांवर अन्याय करणारे व विदेशातील वैद्यकीय विद्याथ्र्यांना प्राधान्य देणारे असल्याने आयएमएचा या नॅशनल मेडिकल कौन्सील विधेयकाला तीव्र विरोध असल्याने हा बंद पुकारला आहे.