राज्यात सिंचनासाठी १५ हजार कोटींचा अतिरिक्त निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:15 AM2021-02-14T04:15:10+5:302021-02-14T04:15:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्यातील जलसिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देणार ...

15,000 crore additional fund for irrigation in the state | राज्यात सिंचनासाठी १५ हजार कोटींचा अतिरिक्त निधी

राज्यात सिंचनासाठी १५ हजार कोटींचा अतिरिक्त निधी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्यातील जलसिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देणार आहोत. त्याचा प्रस्ताव तयार करून राज्यपालांनी ठरवलेल्या सुत्रानुसार त्याचे वाटप होईल. आणि त्यातील वाटा हा तापीच्या प्रकल्पांमध्ये देणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद उपक्रमातंर्गत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे खान्देश दौर्यावर आहेत. शनिवारी सकाळी १० वाजता त्यांनी ‘लोकमत’च्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील शहर कार्यालयाला भेट दिली. यावेळी संपादकीय विभागातील सहकार्यांशी संवाद साधला. प्रारंभी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनिष जैन, जिल्हा समन्वयक विकास पवार उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले की, काही प्रकल्पांमध्ये केंद्र सरकारचा निधी मागील वर्षभरापासून आलेला नाही. कोरोनाच्या काळात पैसे उपलब्ध नसल्याने राज्याचा वाटा देखील कमी राहिला आहे. हा वाटा सध्या भरून काढत आहोत. मोठ्या प्रकल्पांना गती देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अतिरिक्त निधी लागणार आहे. हा १५ हजार कोटींचा अतिरिक्त निधी बाहेरुन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.’

पाटील यांनी सांगितले की, ‘राज्यपाल यांनी ठरवून दिलेल्या सुत्रानुसारच निम्न तापी प्रकल्पाला हा वाटा मिळणार आहे. केंद्र सरकारचे धोरण हे कामे सुरु असलेले प्रकल्प पुर्ण करण्याचे आहे. गोसे खुर्द मध्ये राज्याचा वाटा कमी आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि बळीराजा योजनेतूनदेखील कामे सुरु आहेत. सरकार सध्या मोठ्या प्रकल्पांना गती देण्याचे काम करत आहे. जलजीवन मिशनची कामे देखील वेगात हाती घेतली गेली आहे.’

राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेबाबत पाटील यांनी सांगितले की,‘ या यात्रेचा अनुभव हा अपेक्षेपेक्षा जास्त आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. सर्वच मतदार संघात दौरा होता. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी देखील त्याला साथ दिली. काही जागा जरी पक्ष लढवत नसला तरी तेथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी चर्चा केली. मागच्या विधानसभेच्या आधी मरगळ जाणवत होती. मात्र गावोगाव उत्साह जाणवत आहे. लोकांनीही त्यांचे प्रश्न मांडले. राष्ट्रवादी काँग्रेस लोकांचे प्रश्न सोडवते कारण हा त्यांचा स्थायी भाव आहे. परिसंवाद यात्रा ही पक्ष अभिप्राय यात्रेचे पुढचे स्वरुप आहे. सध्या विदर्भ आणि खान्देशातील ८२ मतदारसंघांमध्ये दौरा केला. आता पुढे कोकण आणि मराठवाड्यात हा दौरा होणार आहे. ’

इनकमिंगनंतर आलेली अडचण सोडवु

राजकारणात संख्येला फार मोठे महत्त्व असते. त्यामुळे पक्ष वाढीसाठी काहींना पक्षात प्रवेश द्यावा लागतो. जेथे ज्याचा प्रभाव जास्त आहे. तो टिकतो. हा राजकारणातील नियम आहे. आता नंतर ज्या ठिकाणी काही अडचणी आल्या आहेत. त्या आम्ही चर्चेतून नक्कीच दूर करु. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा असलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांचे या जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष असते, असेही पाटील यांनी सांगितले.

महाजन यांनी पाणी कापले आम्ही पाणी देणार

माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बारामतीला जाणारे पाणी कमी केले होते. त्यावर छेडले असता पाटील यांनी सांगितले की, आम्ही कुणाचेही पाणी कमी करणार नाही. ज्यांना जेवढी गरज आहे. तेवढे पाणी त्यांना नक्कीच दिले जाईल.

२२ उपसा सिंचन योजनांसाठी ११५ कोटींचा प्रस्ताव

धुळे आणि नंदूरबारच्या २२ उपसासिंचन प्रकल्पांसाठी ११५ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. कुऱ्हा वडोदा प्रकल्पासाठी साडेपाच कोटी देण्याचा प्रस्ताव आहे. त्यातील दोन कोटी रुपये पहिल्या टप्प्यात तर उरलेलेल साडेतीन कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यात दिले जाणार आहेत.

शेतकरी कर्जमाफी संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, थकबाकी नसलेल्या कर्ज वेळेत भरलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. हा लाभ त्यांना मिळावा. यासाठीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुतोवाच केले आहे. त्यासाठी निधी उभा करावा लागणार आहे. योग्य वेळी राज्याची आर्थिक परिस्थीती पाहून त्यावर निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.

Web Title: 15,000 crore additional fund for irrigation in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.