शहरात राहत आहेत १५ हजार भाडेकरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:19 AM2021-08-12T04:19:20+5:302021-08-12T04:19:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, मनपाकडून नव्याने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात ४६ हजार मालमत्ता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, मनपाकडून नव्याने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात ४६ हजार मालमत्ता वाढल्या आहेत. यामुळे मनपाच्या मालमत्ताकराच्या रकमेत वाढ होणार आहे. याच सर्वेक्षणादरम्यान शहरात एकूण भाडेकरू म्हणून राहत असलेल्या नागरिकांची माहितीही प्राप्त झाली आहे. शहरात एकूण १५ हजार १५६ नागरिक भाडेकरू म्हणून राहत आहेत, तसेच अनेक घरमालकांकडून भाडेकरू म्हणून राहत असलेल्या नागरिकांची संख्याही लपविली जात आहे. अशा घरमालकांना मनपाकडून नोटीस बजावत आठवडाभरात मनपात येऊन आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करून फेरमूल्यांकन करण्यासाठी मनपाने २०१७ला अमरावती येथील स्थापत्य एजन्सीला मक्ता दिला. त्यानुसार, एजन्सीच्या माध्यमातून प्रत्येक मिळकतींना नंबरिंग केले. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजमाप केले. घराचे फोटो काढून नकाशे तयार केले, तसेच ड्रोनच्या सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान, शहरातील अनेक घरमालकांनी आपले घर भाड्याने देताना, भाडेकरूसोबत करार न करताच, तसेच मनपालाही याबाबतची माहिती न देताच भाडेकरू ठेवल्याचे आढळून आले आहे. या कारणामुळे मालमत्तांच्या वसुलीवर परिणाम होत आहे. घरभाड्याने दिलेल्या घरमालकाकडून मालमत्ता कराची आकारणी ही वेगळ्या नियमांद्वारे होत असते. मात्र, अनेक घरमालक भाडेकरू ठेवल्याची माहिती मनपाकडे देत नसल्याने आहे. त्या प्रकारातच वसुली होत असते. यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, सर्वेक्षणानुसार आता अनेक भाडेकरूंची माहिती समोर आल्याने, मनपाने यासाठी आता नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे.
मनपा प्रशासन घेणार सुनावणी
मनपाकडून करण्यात आलेले सर्वेक्षण हे दोन ते तीन वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे आजच्या घडीस अनेक भाडेकरू हे घर सोडून गेले असतील किंवा काही भाडेकरू वाढलेही असतील. त्यामुळे मनपाने ज्या घरमालकांना नोटिसा बजावल्या आहेत. अशा घरमालकांची सुनावणी प्रक्रिया घेतली जाणार आहे. जर आजच्या स्थितीत भाडेकरू नसतील, तर तशी माहिती घरमालकांना द्यावी लागणार आहे. जर भाडेकरू असतील, तर भाडेकरूंसोबतचा करारनामा करून घ्यावा लागणार आहे.
माहिती लपविल्यास होणार कारवाई
ज्या घरमालकांनी भाडेकरू ठेवले आहेत. अशा घरमालकांनी मनपाकडे माहिती देण्यास टाळाटाळ केली किंवा माहिती लपविली, तर अशा घरमालकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
प्रभाग समितीनिहाय भाडेकरूंची संख्या
प्रभाग समिती १ - ४ हजार ११७
प्रभाग समिती २ - ३ हजार ५३४
प्रभाग समिती ३ - ४ हजार ४०
प्रभाग समिती ४ - ३ हजार ४६५