मुदत ठेवीच्या पावत्या बेकायदेशीर वर्ग करुन १६ कोटीचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 07:53 PM2021-01-23T19:53:46+5:302021-01-23T19:55:35+5:30
सूरज झंवरला ११ दिवस कोठडी : पुणे, नशिराबादच्या मालमत्ता खरेदीत अपहार
जळगाव : बीएचआर प्रकरणात अटक केलेला सूरज झंवर याने पिता सुनील झंवर व इतरांनी संगनमताने साई मार्केटींग अण्ड ट्रेडींग कंपनी या नावाने टेंडर भरल्याचे भासवून पुण्यातील निगडी, घोले रोड व नशिराबाद येथील मालमत्ता खरेदीत १६ कोटी रुपयांचा अपहार केला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात मुदत ठेवीच्या पावत्या विकत घेऊन त्या बेकायदेशीर वर्ग करण्यात आल्या असल्याचे तपासात उघड झाले आहे. सूरज याला शनिवारी पुणे न्यायालयात हजर केले असता २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
बीएचआरचे कोहीनूर आर्केड बल्क लॅन्ड क्र.२ निगडी, ता.हवेली येथील दुकान क्र,१६,१७,१८ व १८ ए या सात कोटी रुपयांच्या मालमत्तेचा अपहार करुन ही मालमत्ता २ कोठी ११ लाख ११ हजार १११ रुपयांचा खरेदी केल्याचे भासविले, याच प्रकारे बालगंधर्व चौक, घोले रोड पुणे येथील चार व्यापारी गाळे ८ कोटीपेक्षा जास्त किमतीची केवळ ३ कोटी ११ लाख ३३ हजार १११ रुपयांना खरेदी केल्याचे भासविले. यातही अशाच प्रकारे पावत्या वर्ग करण्यात आल्या. नशिराबाद येथील दुकान क्र.१,२ व ३ हे देखील १९ लाख ५१ हजार ५१५ रुपयांना खरेदी केल्याचे भासवून अपहार केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
दरम्यान, सूरज हा साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडींग प्रा.लि.या कंपनीचा संचालक आहे. विविध प्रकारचे टेंडर स्वत:च्या लॅपटॉपवरुन भरायचा. श्री साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडींग कंपनी व श्री साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडींग प्रा.लि. या दोघांचा पत्ता ४२, खान्देश मील शॉपींग कॉम्लेक्स, जळगाव हा एकच असून सूरज हा एका कंपनीत भागीदार होता.