नेरी नाका स्मशानभूमीत सहा दिवसांत १६२ जणांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:15 AM2021-04-10T04:15:11+5:302021-04-10T04:15:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना वाढत असताना मृतांची संख्यादेखील गेल्या वर्षापेक्षा या वर्षी अधिक पटीने वाढलेली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना वाढत असताना मृतांची संख्यादेखील गेल्या वर्षापेक्षा या वर्षी अधिक पटीने वाढलेली आहे. शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत गेल्या सहा दिवसांत तब्बल १६२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, यामध्ये २३ कोरोना रुग्णांचा समावेश आहे. मात्र, इतर १३९ जणांचा मृत्यू कशामुळे झाला आहे, हा प्रश्न कायम आहे. कोणत्याही काळात शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेले नाहीत. तसेच प्रशासनाकडून हे मृत्यू कोरोनामुळे झालेले नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मृतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या लपविली जात आहे का, असाही प्रश्न आता निर्माण आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याआधी नेरी नाका स्मशानभूमीत दिवसाला आठ ते दहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मार्च २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत दिवसाला सरासरी १४ जणांवर अंत्यसंस्कार या ठिकाणी केले जात होते. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून शहरात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मृतांच्या संख्येत वाढ झालेली आहे.
कोरोनाव्यतिरिक्त इतर आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली
शहरात कोरोनाव्यतिरिक्त इतर कारणांनी मृत्यू झालेल्या १३९ जणांवर गेल्या सहा दिवसांत केवळ नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात इतर कारणांमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आतापर्यंत वाढलेली नव्हती. मात्र, आता ही संख्या वाढलेली असल्याने या कारणांचा शोध घेणेदेखील गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, इतर कारणांमुळेदेखील मृत्यू वाढत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
प्रशासन आकडेवारी लपवते आहे का?
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला अकराशेपर्यंत आहे. तर जिल्हाभरात दररोज १४ हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. मात्र, जळगाव शहरातच एका दिवसात केवळ नेरी नाका स्मशानभूमीत दिवसाला २५ हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.
नेरी नाका स्मशानभूमी ही केवळ कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कारासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. शहरात शिवाजीनगर, मेहरूण व पिंप्राळा परिसरातदेखील स्मशानभूमी असून, या ठिकाणीदेखील अनेकांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. या स्मशानभूमींवरील अंत्यसंस्कार होणाऱ्यांचा विचार केला तर ही संख्या दिवसाला ५० पर्यंत पोहोचत आहे. प्रशासनाकडून शहरात दिवसाला कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या केवळ ४ इतकी दाखविले जात आहे. शहरात होणारे एकूण मृत्यू व प्रशासनाकडून सांगण्यात येणारे मृत्यू या आकडेवारीत मोठा फरक जाणवत आहे. यामुळे प्रशासन आपले अपयश लपविण्यासाठी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या लपवत आहे का, असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.
नेरी नाका स्मशानभूमीवर या सहा दिवसांत झालेले अंत्यसंस्कार
तारीख - एकूण अंत्यसंस्कार - कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या
४ एप्रिल - ३४ - ४
५ एप्रिल - ३४ - ६
६ एप्रिल - २१ - ४
७ एप्रिल - ३४ - ४
८ एप्रिल - ३९ - ५