एरंडोल तालुक्यात १६६ कुपोषित बालके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:30 AM2017-12-06T11:30:39+5:302017-12-06T11:35:46+5:30
अंगणवाडी केंद्रात कुपोषणमुक्तीसाठी अंडी, खजुरांचा पूरक आहार
आॅनलाईन लोकमत
एरंडोल,दि.६ : शासनाकडून कुपोषणमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असतातना एरंडोल तालुक्यात एकूण १२ हजार १५७ बालके असून, त्यापैकी १६६ तीव्र कुपोषित बालके आहेत. त्यांना अंडी व खजुराचा पूरक आहार अंगणवाडी केंद्रामार्फत पुरविण्यात येत आहे.
एरंडोल तालुक्यात वजन घेतलेल्या बालकांची संख्या ११ हजार ८५० आहे. त्यात साधारण श्रेणीचे १० हजार ५९३ बालके आहेत, तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या १०९१ आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये तीव्र कुपोषित बालके १७४ व नोव्हेंबर २०१७ मध्ये १६६ बालके तीव्र कुपोषित आहेत.
पद्मालय येथे परसबाग लावल्यामुळे बालकांना रोजच्या आहारात पालेभाज्या व फळभाज्या खाऊ घातल्या जात आहेत. त्यामुळे जवळपास वर्षभरापासून तेथे कुपोषण नाही. याशिवाय ताडे, उत्राण गु.ह., वैजनाथ, खेडी खुर्द येथील अंगणवाड्या कुपोषणमुक्त झाल्या आहेत.
पावसाळ्यात यावर्षी पद्मालय पॅटर्न वापरून तालुक्यात ४० अंगणवाड्यांमध्ये परसबाग लावण्यात आल्या. मात्र पाण्याअभावी सदर उपक्रम यशस्वी झाला नाही. ग्रामसेवकांचे सहकार्य घेऊन परसबागेसाठी पाण्याचे नियोजन केले तर परसबागेच्या माध्यमातून संपूर्ण तालुका मुक्त होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
कुपोषित असलेल्या बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केला जात आहे. त्यामुळे कुपोषणावर नियंत्रण करणे शक्य होणार आहे.
जयबून तडवी, प्रभारी प्रकल्पाधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, एरंडोल