तीन दिवसात १७ कोरोना बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:28 AM2021-03-13T04:28:06+5:302021-03-13T04:28:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत रुग्णांसोबतच मृतांची संख्याही वाढली आहे. गेल्या तीन दिवसात १७ बाधितांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत रुग्णांसोबतच मृतांची संख्याही वाढली आहे. गेल्या तीन दिवसात १७ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गंभीर बाब म्हणजे यातील पाच जण हे ४५ वर्षांखालील होते. उशिरा रुग्णालयात येणे, अन्य व्याधींमुळे प्रतिकारक्षमता कमी असणे अशी काही प्राथमिक स्वरूपाची कारणे यामागे दिली जात आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने उसळी घेतली आहे. बुधवारी तर एका दिवसात ९८३ बाधितांची नोंद करण्यात आली आहे. अत्यंत झपाट्याने ही रुग्णवाढ होत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच एका दिवसात सहा बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तीन दिवसात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात शहरातील पाच रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी तातडीने निदान व्हावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
तज्ज्ञ काय सांगतात
कमी वयाच्या मृत्यूमागे वेगवेगळी कारणे असू शकतात. यात न्यूमोनियाचे प्रमाण अधिक असणे हे एक प्रमुख कारण असू शकते.
कोरोना विषाणूमुळे शरीरात घात पदार्थांची निर्मिती होते. यामुळे सुरुवातीला रुग्णाला कमी लक्षणे असतात; मात्र अशा स्थितीत हा आजार अंगावर काढणे जीवावर बेतू शकते.
रुग्णाला रुग्णालयात येण्यास उशीर झाल्यास रुग्ण सायटोकाईन स्टॉर्ममध्ये जातो. यात त्याच्या हृदय, किडनी आणि फुफ्फूसांवर परिणाम होतो, त्याला श्वास घ्यायला त्रास होतो व अखेर रुग्ण दगावतो, रुग्ण तरुण असला तरी ही परिस्थिती ओढवू शकते, त्यामुळे आजार अंगावर काढणे हे जीवावर बेतू शकते, असे औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले सांगतात.
असे झाले मृत्यू
८मार्च -६, (२२, ३८ वर्षीय रुग्णांचा समावेश)
९ मार्च-५ (४०,४०,४३ वर्षीय रुग्णांचा समावेश)
१० मार्च - ६ (६० वर्षाखालील दोघांचा समावेश)
असे आहेत मृत्यू
एकूण मृत्यू : १४२१
५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या रुग्णांचे मृत्यू :१२५७
अन्य व्याधी असलेले रुग्ण : ७१५
कोट
आजाराचे लवकर निदान व्हायला हवेत, डेथ ऑडिट कमिटीकडून मृत्यूची कारणे शोधली जात आहेत. कमी वयाच्या मृत्यूमागे अन्य आजारांची शक्यता असते. शिवाय उशिरा रुग्णालयात येणे हेही धोकादायक ठरू शकते. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक.