जळगावात तीन दिवसात आढळले १७ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 01:39 PM2020-05-14T13:39:39+5:302020-05-14T13:40:15+5:30
आणखी तीन संशयितांचा मृत्यू, अहवालाची अद्याप प्रतीक्षा
जळगाव : शहरात गेल्या तीन दिवसांमध्ये १७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत़ हे रुग्ण नवनवीन भागात सापडत असल्याने अधिकच चिंता व्यक्त केली असून शहरात कोरोनाचा धोका अधिक वाढल्याचे चित्र आहे़ दरम्यान, गुरूवारी सकाळी तीन संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे़
एकीकडे अमळेनरात झपाट्याने संख्या वाढत असताना जळगाव मात्र, शांत होते, आता अमळनेर शांत झाल्यानंतर जळगावात रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे़
गुरूवारी सकाळी तीन कोरोना संशयितांचा मृत्यू झाला़ त्याचे स्वॅब घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यात एक अमळनेर येथील महिला व अन्य एका १८ वर्षीय तरूणाचा समावेश आहे़ तरूण हा झारखंडकडे जात होता़ जळगावच्या आसपास त्याचा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे़ त्याला श्वासोश्वासाचा त्रास असल्याने त्याचे स्वॅब घेण्यात आला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे़ यासह अमळनेरातही एका वृद्धाचा मृत्यू झाला.
शहरात धोका वाढला
शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने नवनवीन भागात रुग्ण आढळून आलेले आहेत़ रुग्णांची संख्या ४० वर गेलेली आहे़ केवळ दाट वस्तीनाही तर अपार्टमेंट व उच्चभ्रु वस्तीतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे़ बाधितांच्या संपर्कातीलच नव्हे तर नवनवीन रुग्ण रोज समोर येत असल्याने त्यांची हिस्ट्री काढून सोर्स शोधणे महापालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे़ गेल्या दोन दिवसात जळगाव शहरात तेरा रुग्ण आढळून आले आहेत़
सिंधी कॉलनीतील हाय रिस्क ८ जण निगेटीव्ह
सिंधी कॉलनीत अमळनेरची हिस्ट्री असलेला एका बाधित रुग्ण आढळून आला होता़ या बाधिताच्या संपर्कातील ८ जणांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले असून एकाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने ९३ वर्षीय वृद्धाला बुधवारी रात्री कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ या बाधित वृद्धांच्या संपर्कातील नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़