जिल्ह्यात क्षयरोगाचे १७५ बाधित, तर ५ हजारांवर संशयित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:16 AM2020-12-22T04:16:49+5:302020-12-22T04:16:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान दि. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान दि. १ ते १६ डिसेंबरदरम्यान राबविण्यात आले. यात क्षयरोगाचे (टीबी) १७५ बाधित, तर ५७७७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यासह कृष्ठरोगाचेही १६६ रुग्ण समोर आले आहेत. या रुग्णांवर तातडीने औषधाेपचार सुरू करण्यात येणार आहे.
जिल्हाभरात या मोहिमेअंतर्गत ३ लाख ३१ लाख २५ हजार ६१९ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन ही तपासणी केल्यानंतर संशयित रुग्णांच्या थुंकीचे नमुने घेऊन अनेकांचे एक्स-रे काढून क्षयराेगाचे निदान करण्यात आले आहे. तर ज्यांच्या अंगावर चट्टे होते अशा रुग्णांची तपासणी करून कुष्ठरोगाचे निदान करण्यात आले आहे. यात अनेक संशयितांची अद्याप तपासणी बाकी असून, रुग्णांवर तातडीने औषधोपचार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. इरफान तडवी यांनी दिली. क्षयरोगाचे आदिवासी भागातही अधिक रुग्ण समोर आल्याचे चित्र आहे. या भागामध्ये शंभर टक्के तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. सर्व तालुक्यांच्या तुलनेत चोपडा तालुक्यात सर्वाधिक १८ रुग्ण आढळले आहेत.
कोट
तपासणी मोहिमेत आतापर्यंत १७५ क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागातील २३३१ नागिरकांचे या तपासणी मोहिमेत एक्स-रे काढण्यात आले असून, ४९०९ नागरिकांच्या थुंकीचे नमुने घेण्यात आले आहेत. अद्याप काही नमुन्यांची तसेच एक्स-रेची तपासणी बाकी असल्याने अजून रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे. - डॉ. जयवंत मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी
तालुकानिहाय टीबीचे रुग्ण
भुसावळ- १७, चाळीसगाव-१३ , चोपडा-१८ , धरणगाव -१६ , एरंडोल- १२, जळगाव ग्रामीण-०८ , जामनेर-१४, पारोळा-१० , पाचोरा-१० , रावेर-१७ , यावल-०५, मुक्ताईनगर-११ , अमळनेर-१६ , भडगाव-०४, बोदवड- ०४