सतरा मजलीला मिळाल्या १७ व्या सर्वांत उच्चशिक्षित महिला महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:15 AM2021-03-19T04:15:35+5:302021-03-19T04:15:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या इतिहासातील आजपर्यंतच्या महिला महापौरांमध्ये जयश्री महाजन यांच्या रूपात सर्वांत उच्चशिक्षित महापौर महापालिकेला लाभल्या ...

The 17th most educated woman mayor on the 17th floor | सतरा मजलीला मिळाल्या १७ व्या सर्वांत उच्चशिक्षित महिला महापौर

सतरा मजलीला मिळाल्या १७ व्या सर्वांत उच्चशिक्षित महिला महापौर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेच्या इतिहासातील आजपर्यंतच्या महिला महापौरांमध्ये जयश्री महाजन यांच्या रूपात सर्वांत उच्चशिक्षित महापौर महापालिकेला लाभल्या आहेत. एम.एस्सी., एम.फिल असे शिक्षण घेऊन गृहिणी, शिक्षिका नगरसेविका ते महापौर असा प्रवास जयश्री महाजन यांचा पूर्ण झाला आहे. आज १७ मजलीच्या १७ व्या महापौर म्हणून जयश्री महाजन या विराजमान झाल्या आहेत.

जयश्री महाजन या महापालिकेत प्रभाग क्रमांक १५ मधून सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. पहिल्यांदा २०१३ मध्ये महाजन या खाविआकडून विजयी झाल्या होत्या, तर दुसऱ्यांदा २०१८ मध्ये महाजन या शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाल्या. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे निकटवर्तीय नगरसेवक शिवसेनेला सोडून भाजपमध्ये जात असतानादेखील जयश्री महाजन यांचे पती तथा विद्यमान मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे सुरेशदादा जैन यांच्याशी एकनिष्ठ राहिले. या एकनिष्ठ तेचे फळ सुनील महाजन व जयश्री महाजन यांना महापौरपदाच्या रूपाने मिळाले आहे. जयश्री महाजन यांचे माहेर जळगाव तालुक्यातील भादली हे असून, त्यांना दोन मुले आहेत. एका खाजगी शाळेत जयश्री महाजन या शिक्षिकादेखील असून, नगरसेविका म्हणून महाजन या आपल्या प्रभागातील नागरिकांचे प्रश्नदेखील सोडवतात. तसेच मुलांचा अभ्यास व घरातील जबाबदारीदेखील महाजन या स्वतः पार पाडताना दिसतात. महापालिकेच्या महासभांमध्ये देखील आपल्या प्रभागातील प्रश्न व महिलांचे प्रश्नदेखील चांगल्या प्रकारे मांडतात. गेल्या काही वर्षांपासून जळगावकर शहरातील रस्त्यांमुळे हैराण आहेत. खड्डे, धूळ अशा समस्यांनी जळगावकर त्रस्त झाले असून, या समस्यांवर मात करून जळगावकरांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान जयश्री महाजन यांना पार पाडावे लागणार आहे.

ऐतिहासिक सत्तांतर अन् महापौरपदी निवड

२०१८ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा जबरदस्त पराभव करत भाजपने ७५ पैकी तब्बल ५७ जागांवर बहुमत मिळवले होते. अशा परिस्थितीत संपूर्ण ५ वर्ष भाजपची महापालिकेवर निर्विवाद सत्ता राहील असेच राजकीय विश्लेषकांचे गणित होते. मात्र, भाजपमधील नाराजांची मोट बांधून शिवसेनेने महापालिकेवर भगवा फडकवला असून, जयश्री महाजन या ऐतिहासिक सत्तांतरातील महापौर ठरणार आहेत. महापालिकेच्या सतरा मजलीवर सतराव्या महापौर म्हणून जयश्री महाजन या आता विराजमान झाल्या आहेत.

Web Title: The 17th most educated woman mayor on the 17th floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.