१८ तलाठी निलंबित
By admin | Published: January 4, 2017 12:44 AM2017-01-04T00:44:17+5:302017-01-04T00:44:17+5:30
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी विभागीय आयुक्तांच्या दौºयानंतर घेतलेल्या आढावा बैठकीनंतर जिल्ह्यातील १८ तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
जळगाव : सातबारा संगणकीकरण, महसूल वसुली करण्यासाठी होणारी दिरंगाई या कारणावरून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी विभागीय आयुक्तांच्या दौºयानंतर घेतलेल्या आढावा बैठकीनंतर जिल्ह्यातील १८ तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
गेल्या महिन्यात विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. त्यांनी जलयुक्त शिवार, सातबारा संगणकीकरण,अवैध गौण खनिज वाहतुकीवरील दंडात्मक कारवाई, रमाई व शबरीमाता घरकूल योजनेची त्यांनी माहिती घेतली होती. जिल्ह्यात महसूल वसुलीत काही प्रमाणात घट आढळून आली तर सातबारा संगणकीकरणात देखील अपेक्षित अशी कामगिरी करण्यात आलेली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
या बैठकीनंतर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी तालुकानिहाय आढावा घेत कामात दिरंगाई करणाºया तलाठ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशानुसार संबधित प्रातांधिकाºयांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत.
तहसीलदारांवरील कारवाई लांबली
अवैध गौण खजिन वाहतूक करणाºयांवर दंडात्मक कारवाईचे प्रमाण कमी असल्याने विभागीय आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्ह्यातील ८ तहसीलदारांना नाशिक विभागीय कार्यालयामार्फत कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश दिले होते. मात्र आजपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून नोटीस काढलेल्या नाहीत. त्यामुळे सध्यातरी तहसीलदारांवरील कारवाई पुढे लांबली आहे.
निलंबित तलाठी पुढीलप्रमाणे
पारोळा-सुभाष विठ्ठल वाघमारे (तलाठी भोलाणे),एरंडोल- डी.पी.पाटील (तलाठी आडगाव), वाय.एम.पाटील (तलाठी,कासोदा), धरणगाव-व्ही.एन.माळवे (तलाठी,दोनगाव),पाचोरा-जे.एस.चिंचोले (तलाठी वरखेडी), भडगाव-एस.ए.तडवी (तलाठी गोडगांव), अमळनेर-एन.जी.कोचुरे (तलाठी दोधवद), आर.जी.विंचूरकर (तलाठी डांगर बुद्रुक),पी.एन.खंबायतकर (तलाठी भरवस), जे.ए.जोगी (तलाठी सडावण), जळगाव- जी.एस.चत्रे, व्ही.एन.संदानशिव, एस.आर.नेरकर, जामनेर-एस.जी.पठाण, अजय गवते यांचा समावेश आहे.