मेंढोळदे येथील १८० कुटुंब उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:55+5:302021-05-29T04:13:55+5:30
मुक्ताईनगर : पूर्णा व तापी नदी किनारीलगतच्या उचंदे गणातील पुरणाड, उचंदे , शेमळदे, पंचाणे, मुंढोदे, मुंढोळदे, नायगाव, पिंप्रीनांदू, ...
मुक्ताईनगर : पूर्णा व तापी नदी किनारीलगतच्या उचंदे गणातील पुरणाड, उचंदे , शेमळदे, पंचाणे, मुंढोदे, मुंढोळदे, नायगाव, पिंप्रीनांदू, बेलसवाडी, कर्की, पिंप्रीपंचम भागात २७ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक उद्भवलेल्या वादळाचा मोठा परिणाम झाला आहे. हजारो हेक्टरवरील केळी बागा जमीनदोस्त झाल्या. तसेच अनेक घरांची , गुरांच्या गोठ्याची पडझड झाली. विजेचे खांब व तारा तुटल्याने परिसर अंधकारमय झाला. वादळामुळे मेंढोळदे येथील १८० कुटुंब उघड्यावर आल्याने त्यांच्या भोजनाची व्यवस्था आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच घर दुरुस्तीसाठी स्वखर्चातून १५ मिस्तरी व मजूर यांना कामाला लावले.
या नुकसानीची २८ रोजी सकाळी आठपासून आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार श्वेता संचेती, गटविकास अधिकारी संतोष नागतिळक, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, महावितरणचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक अशा शासकीय फौजफाट्यासह पाहणी केली.
यावेळी सरसकट पंचनामे करून तत्काळ अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी संबंधितांना दिल्या. तसेच मुंढोळदे या गावातील सुमारे १८० च्या वर घरांचे पत्रे वादळात उडून गेले आणि मुसळधार पावसात भिजून सर्व डाळ, दाणा व अन्नाची नासाडी झाल्याने बुधवारी रात्रीपासून उपाशी पोटी असलेल्या गावकऱ्यांसाठी स्वखर्चातून सकाळ, संध्याकाळ जेवणाची व्यवस्था केली. ही जबाबदारी शिवसेना शहर संघटक वसंत भलभले हे पार पाडीत आहेत. तसेच गावातील उदध्वस्त घरे तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा उभी करण्यासाठी आमदारांनी पदरमोड करून १५ मजुरांची टीम सहकार्यासाठी तत्काळ उपलब्ध केली.
यावेळी आमदारांसह काँग्रेस जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, दिलीप पाटील, राजेंद्र तळेले, स्वीय सहायक प्रशांत पाटील व इतर पदाधिकारी शेतकरी तसेच गावकरी उपस्थित होते.
शासनाकडून तत्काळ मदत मिळावी म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व मुख्य सचिव यांचेशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली.
फोटो कॅप्शन
उचंदा परिसरात पाहणी करताना आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार श्वेता संचेती, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, कृषी अधिकारी अभिनव माळी व इतर.
(छाया : विनायक वाडेकर)