चाळीसगावला १८ व्या शतकातील 'चर्च'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 05:14 PM2018-12-19T17:14:37+5:302018-12-19T17:20:23+5:30
चाळीसगाव शहरात स्टेशन रोड लगत गुडशेफर्ड विद्यालयाच्या आवारात असणा-या चर्चला दोनशे वर्षाची परंपरा आहे. २५ रोजी चर्च मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
जिजाबराव वाघ
चाळीसगाव : अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ सण साजरा करण्यासाठी ख्रिस्ती बांधवांची लगबग सुरु झाली आहे. चाळीसगाव शहरात स्टेशन रोड लगत गुडशेफर्ड विद्यालयाच्या आवारात असणा-या चर्चला दोनशे वर्षाची परंपरा आहे. २५ रोजी चर्च मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती चर्चचे अनिल जामनिक यांनी दिली. शहरातील १२५ ख्रिस्ती बांधव नाताळ उत्सवात सहभागी होणार आहे.
चाळीसगाव हे मुंबई - कलकत्ता लोहमार्गावरचं जंक्शन रेल्वे स्टेशन असल्याने येथे स्वातंत्र्यपूर्व कालखंडात काही ब्रिटीश व अमेरिकन ख्रिस्ती मिशनरी कुटुंब वास्तव्यास होती. १८ व्या शतकात गुडशेफर्ड विद्यालयाच्या आवारात दगडी बांधकाम असलेला चर्च मिशनरी कुटूंबांनी उभारला. अनेक वर्ष चर्चच्या परिसरात काही कुटुंब राहत होती. त्यानंतर हे कुटुंब मायदेशी गेल्याने सद्यस्थितीत नाशिक येथील दि इव्हॅन्जेलीकल अलायन्स मिनिस्ट्रीज ही संस्था चर्चचे व्यवस्थापन सांभाळते.
२५ रोजी विविध कार्यक्रम
नाताळ सण-उत्सव साजरा करण्यासाठी येथील ख्रिस्ती बांधवांमध्ये मोठा उत्साह असून चर्च मध्ये आकर्षक सजावट केली जात आहे. २५ रोजी ख्रिसमस निमित्त सकाळी प्रभु येशु ख्रिस्ताची भजने, गीत गायन व प्रार्थना होणार आहे. प्रभु येशुंचे जीवन दर्शन घडविणारे प्रवचन होईल. यात शांती, बंधूभाव, प्रबोधन आणि नीतिकथा यांचा संदेश दिला जातो. रेव्ह. अनिल जामनिक चर्चची देखभाल करतात. येथे पंच मंडळ देखील कार्यरत आहे.