जळगावमध्ये मृत्यूचे तांडव बस अपघातात १९ ठार
By admin | Published: June 26, 2015 03:14 AM2015-06-26T03:14:49+5:302015-06-26T03:29:14+5:30
चाळीसगाव-धुळे मार्गावर गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान एसटी बस, कंटेनर व मोटरसायकलच्या तिहेरी भीषण अपघातात बसमधील १९ प्रवासी ठार
चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव-धुळे मार्गावर गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान एसटी बस, कंटेनर व मोटरसायकलच्या तिहेरी भीषण अपघातात बसमधील १९ प्रवासी ठार तर २० जण जखमी झाले. मृतांमध्ये चौदा पुरूष, तीन महिला व दोन बालकांचा समावेश आहे. अपघातानंतर मृत्यूचे तांडव पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रात्रीपर्यंत सोळा मृत प्रवाशांची ओळख पटली होती. ते चाळीसगाव परिसरातील आहेत.
चाळीसगाव आगाराची सुरतला जाणारी बस शहरापासून १९ कि.मी. अंतरावरील खडकीसीम गावाजवळून जात असताना धुळ्याहून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची मोटारसायकलला धडक बसून चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर कंटेनरने बसला जबरदस्त धडक दिली. त्यामुळे बस काही अंतरापर्यंत मागे फरफटत गेली आणि दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली पडली. अपघातात चालकाच्या बाजूकडील बसचा भाग अक्षरश: उद्ध्वस्त झाला. अपघाताची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मेहुणबारे व खडकेसीम गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून चाळीसगावला तर काहींना धुळ््याला रवाना करण्यात आले.