खान्देशातील १९ महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश थांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:59 PM2018-06-15T22:59:58+5:302018-06-15T22:59:58+5:30
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील १६ महाविद्यालयांनी फक्त संलग्नीकरणाच्या विस्तारास मान्यता देण्यात आली असली तरी काही अटींची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे या महाविद्यालयांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास विद्यापीठाने मनाई केली आहे.
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील १६ महाविद्यालयांनी फक्त संलग्नीकरणाच्या विस्तारास मान्यता देण्यात आली असली तरी काही अटींची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे या महाविद्यालयांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास विद्यापीठाने मनाई केली आहे.
सन २०१८/१९ या वर्षासाठी संलग्नीकरणाचे प्रस्ताव महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे सादर केले होते. या महाविद्यालयांची तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी स्थानिक तपासणी समिती नियुक्त केली होती. समितीने सादर केलेला अहवाल हा अधिष्ठाता मंडळाच्या १६ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला. अधिष्ठाता मंडळाने विद्यार्थी प्रवेशासंदर्भात विद्या परिषदेच्या २९ मे रोजी झालेल्या सभेत शिफारसी सादर केल्या.
त्यानुसार ज्या महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष २०१८/१९ करीता पदवी/पदव्युत्तर वर्गास प्रथम वर्षास किंवा थेट द्वितीय वर्षास विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यास मनाई करण्यात आली आहे. या महाविद्यालयांनी संलग्नीकरणाच्या नुतनीकरणाच्या पत्रात नमूद केलेल्या अटींची पूर्तता करण्याबाबत १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केलेले हमीपत्र सादर करण्यासह प्राचार्य, ग्रंथपाल, शारिरीक शिक्षण संचालक व नियुक्तीचे पुरसे प्रयत्न केल्याबाबत दस्तऐवज सादर करण्याची सूचना केली आहे.
मनाई केलेल्या महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास हे प्रवेश मान्य करण्यात येणार नाहीत व त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधित महाविद्यालयांची राहिल असे आदेश उपकुलसचिव जी.एन.पवार यांनी काढले आहे.
या महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेशाला मनाई
आर.आर.वरिष्ठ महाविद्यालय, जळगाव,के.नारखेडे कॉलेज आॅफ सायन्स, भुसावळ, आर्ट अॅण्ड कॉमर्स कॉलेज, धानोरा, नंदुरबार, आर्ट,कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज वलवाडी, धुळे, विज्ञान महाविद्यालय, शहादा, कॉमर्स, सायन्स व मॅनेजमेंट कॉलेज, थाळनेर,धुळे, आर्ट कॉलेज चोपडा, आर्ट, कॉमर्स व सायन्स कॉलेज, पाल, ता.रावेर, श्री बलराम पाटील आर्ट अॅण्ड सायन्स कॉलेज बेहेड, जि.धुळे, आर्ट, सायन्स व कॉमर्स कॉलेज, बोराडी, जि.धुळे, कला महाविद्यालय कोळगाव, ता.भडगाव, आर.के.एम.सीनिअर कॉलेज बहादरपूर, ता.पारोळा, स्वामी विवेकानंद आर्ट,कॉमर्स, कॉलेज जामनेर, श्री.काकासाहेब हिरालाल चौधरी आर्ट, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज नंदुरबार, जी.एच.रायसोनी कॉलेज आॅफ आटर्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स, जळगाव, ललित कला महाविद्यालय, जळगाव, कॉलेज आॅफ एज्युकेशन, नंदुरबार, जी.एच.रायसोनी स्कूल आॅफ लॉ, शिरसोली रोड, जळगाव, इन्स्टीट्यूड आॅफ कॉम्प्युटर अॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज,चाळीसगावचा समावेश आहे.