रावेर येथे अनुदान रखडल्याने घरकुलांचे २०० लाभार्थी पावसाळ्यात उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 03:44 PM2019-08-18T15:44:17+5:302019-08-18T15:51:51+5:30
रावेर शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या २०० घरकुलांच्या पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या ४० हजारांच्या अनुदानात ओट्याच्या पातळीपर्यंत बांधकाम झाल्यानंतर तब्बल चार ते पाच महिन्यांपासून प्रत्येकी ६० हजार रु. अनुदानाचा दुसरा टप्पा रखडला आहे.
रावेर, जि.जळगाव : शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या २०० घरकुलांच्या पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या ४० हजारांच्या अनुदानात ओट्याच्या पातळीपर्यंत बांधकाम झाल्यानंतर तब्बल चार ते पाच महिन्यांपासून प्रत्येकी ६० हजार रु. अनुदानाचा दुसरा टप्पा रखडला असल्याने शहरातील गरजू व गरीब लाभार्र्थींचा संसार ऐन पावसाळ्यात उघड्यावर पडल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या २०० घरकुलांच्या लाभार्थींचा प्रत्येकी ४० हजार रू. अनुदानाचा आठ लाख रुपयांचा पहिला टप्पा रावेर पालिकेला प्राप्त झाला होता. त्या अनुषंगाने संबंधित लाभार्थ्यांनी आपला तोडका मोडकळीस आलेला निवारा तोडून नवीन घरकुलांची मुहूर्तमेढ रोवली.
दरम्यान, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मात्र गत चार ते पाच महिन्यांपासून या घरकुलांचे बांधकाम पायाभरणी करून ओट्याच्या समतल येवून, दुसऱ्या प्रत्येकी ६० हजार रुपयांप्रमाणे १ कोटी २० लाख रुपये अनुदानाचा दुसरा टप्पा रखडला आहे. यामुळे संबंधित लाभार्र्थींचा संसार ऐन पावसाळ्यात उघड्यावर पडल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
यासंबंधी शिवसेनेतर्फे रावेर पालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता, तर संबंधित लाभार्र्थींनी कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे हे रावेर दौºयावर असताना संबंधित गरजू लाभार्थींनी रावेर पालिकेच्या बहुउद्देशिय सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी त्यांना घेराव घालून त्यांचे लक्ष वेधले होते.
त्याप्रसंगी आमदार जावळे यांनी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्याकडून माहिती जाणून घेत थेट म्हाडाचे मुख्य कार्यकारी अभियंता मुगलीकर यांच्याशी संपर्क साधून तातडीने ही समस्या धसास लावण्याचे आश्वासन दिले आहे.
रावेर शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या २०० घरकूल लाभार्र्थींना प्रत्येकी ६० हजार रुपयांप्रमाणे रावेर पालिकेचा १ कोटी २० लाख रुपये अनुदानाचा दुसरा टप्पा म्हाडाकडे रखडला आहे. कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांनी म्हाडाचे कार्यकारी अभियंता मुगलीकर यांच्याशी संपर्क साधला. दोन-तीन दिवसांत तो प्रश्न मार्गी लागणार आहे. - रवींद्र लांडे, मुख्याधिकारी, नगरपालिका, रावेर