२ गायी व ९ गोऱ्ह्यांचा ट्रकमध्ये गुदमरून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:12 AM2021-07-16T04:12:39+5:302021-07-16T04:12:39+5:30
रावेर : खिरोदा रस्त्यावर ट्रक (आर जे - ५२/ जी ए - ५४१६) मध्ये निर्दयतेने २१ गायी व ४२ ...
रावेर : खिरोदा रस्त्यावर ट्रक (आर जे - ५२/ जी ए - ५४१६) मध्ये निर्दयतेने २१ गायी व ४२ गोऱ्ह्यांचे तोंड व पाय बांधून विनापरवाना अवैधरीत्या कत्तलीसाठी नेले जात होते. यावेळी गोवंशप्रेमींनी व पोलिसांनी पाठलाग केला असता ट्रकचालक व त्याचे अन्य साथीदारांनी भाटखेडा गावाजवळ ट्रक उभा करून पोबारा केला. या ट्रकमध्ये २ गायी व ११ गोऱ्ह्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे आढळून आले. ही घटना भाटखेडा गावाजवळ दि १४ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.
सदर ट्रकमधून १९ गायी व ३३ गोऱ्ह्यांची घायाळ अवस्थेत सुटका करण्यात पोलिसांना यश आले असून ट्रकसह जिवंत व मयत गोवंश मिळून १९ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ट्रकमधून २१ गायी व ४२ गोऱ्ह्यांची आगळीक करून पाय व तोंड बांधून निर्दयतेने कोंबून अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक करीत असतांना गोवंशप्रेमींनी तसेच पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, फौजदार मनोज वाघमारे व पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग केला असता ट्रकचालक व क्लिनर तथा अन्य साथीदारांनी भाटखेड्याजवळ ट्रक उभा करून घटनास्थळावरून पोबारा केला.
७ लाखांच्या १९ गायी व ३३ गोऱ्ह्यांची सुटका
या ट्रकमध्ये १ लाख ६५ हजार रु. किमतीच्या २ गायी व ११ गोऱ्ह्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे आढळून आले. तर ७ लाख ८० हजार रुपये किमतीच्या १९ गायी व ३३ गोऱ्ह्यांची घायाळ अवस्थेत ग्रामस्थ व पोलिसांनी जिवंत सुटका केली आहे. दरम्यान १० लाख रुपये किमतीच्या ट्रकसह १९ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त गायी व गोऱ्ह्यांची गोशाळेत रवानगी
जिवंत १९ गायी ३३ गोऱ्ह्यांची जळगाव लगतच्या रतलाल सी. बाफना गोशाळेत रवानगी करण्यात आली असून, मयत २ गायी व ११ गोऱ्ह्यांचा दफनविधी श्रीकृष्ण गोशाळेमार्फत करण्यात आला.
पो. कॉ. उमेश नरेश नरवाडे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात अज्ञात वाहनचालक व त्याच्या साथीदाराविरुध्द भादंवि कलम ४२९,सह महाराष्ट्र पशू संर्वधन अधिनियम कलम ५(अ ),५(ब),९, सह महाराष्ट्र पशू क्रूरता अधिनियम ११ चे (१),(अ), (फ), (ह), (क),(१) ,९ सह महा.पो. अधि. १९५१ ते कलम ११९, सह महा. पशू वाहतूक अधिनियम ४७ ,४८,४९ ,[अ], व महाराष्ट्र मोटर वाहन अधिनियम ८३/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सतीश सानप पुढील तपास करीत आहेत.