चिंचगव्हाण येथे २लाखाचे बनावट खत जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 06:53 PM2020-06-11T18:53:18+5:302020-06-11T18:53:27+5:30
कृषि विभागाची कारवाई : तिघांविरुद्ध गुन्हा
मेहुणबारे, ता. चाळीसगाव- तालुक्यातील चिंचगव्हाण येथे एका कृषी केंद्र चालकाकडे ठेवलेले सुमारे २ लाख १० हजार रुपए किंमतीच्या बनावट युरिया खताच्या २०० गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचगव्हाण येथे गावापासून अर्ध्या किमी अंतरावर असलेल्या एका शेतात पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा खताचा साठा असल्याची गोपनीय माहिती जिल्हा कृषी विभागाला मिळाली. यानुसार जिल्हा कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अरूण तायडे यांनी चाळीसगाव येथे धाव घेऊन तालुका कृषी अधिकारी सी. डी. साठे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम. एस. भालेराव, कृषी सहाय्यक टी. टी. पवार, टी. डी. खोत, मेहूणबारे पोलीस ठाण्याचे हवालदार गोपाल पाटील यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी १० वाजता छापा टाकला असता युरिया खताच्या सुमारे २०० गोण्या आढळल्या. हे खत बनावट असल्याचे आढळून आले. कृषी विभागाच्या पथकाने हे खत जप्त करून घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर हे खत एका ट्रॅ्क्टरद्वारे मेहूणबारे पोलीस स्टेशनला आणले. चिंचगव्हाण शिवारात कृषी विभागाने बनावट खताचा साठा जप्त केल्याची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पथकाने त्याची विचारपूस केली असता हा माल चाळीसगाव येथील महावीर कृषी केंद्राचे संचालक शैलेश साखरचंद छाजेड याच्याकडून विकत घेऊन विक्रीसाठी आणल्याची माहिती कृषी केंद्राचा संचालक प्रविण निकम याने कृषी विभागाच्या पथकाला चौकशीत दिली. याप्रकरणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मेहूणबारे पोलीस स्टेशनला बनावट खत बाळगून फसवणूक केल्याप्रकरणी रूपेश कृषी केंद्राचा संचालक प्रविण काशिनाथ निकम याच्यासह महावीर कृषी केंद्राचा संचालक शैलेश साखरचंद छाजेड, काशिनाथ वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.