२२ लाखाच्या फसवणूक प्रकरणात २ वर्ष कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:38 PM2019-08-06T12:38:07+5:302019-08-06T12:38:36+5:30
दोन कलमामध्ये वेगवेगळी शिक्षा
जळगाव : गृह उद्योगातून रोजगार देण्याचे आमिष दाखवून २२ महिलांची २२ लाखात फसवणूक करणाऱ्या मनोज आधार नाथबाबा (वय ३० रा. खंडेराव नगर, पिंप्राळा)याला न्यायालयाने सोमवारी दोन वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. न्या.सी.व्ही.पाटील यांनी सोमवारी हा निकाल दिला.
आरोपी मनोज नाथबाबा याने ३ जून २०१७ रोजी ओपीएम महिला उद्योग या नावाने मसाल्याच्या उद्योगाकरीता महिलांना रोजगार देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी एका गटातून कम्युनिटी रिसर्च पर्सन (सीआरपी) नेमून प्रत्येकी १ हजार रुपये सभासद शुल्क घेवून १०० सभासद आणण्यास सांगितले. १०० सभासद झाल्यानंतर सीआरपीला ५ हजार रुपये पगार देण्याचे आमिष दिले होते. ६२ महिला सभासदांचे ६२ हजार व २२ सीआरपीची नोंदणी करणाऱ्या २२ महिलांमार्फत २ हजार २६१ सभासदांचे प्रत्येकी १ हजार प्रमाणे एकूण २२ लाख ६१ हजार रुपये घेत ती रक्कम परत न करता महिलांची फसवणूक केली होती.
२१ साक्षीदारांची तपासणी
या प्रकरणी सुनीता सुनील महाजन (रा.तुकारामवाडी) यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला मनोज नाथबाबा याच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. न्या.सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला.या प्रकरणात फिर्यादी तसेच तपासाधिकारी समाधान पाटील यांच्यासह २१ साक्षीदार तपासण्यात आले. ४२० कलमांतर्गत २ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व कलम ४०६ मध्ये १ वर्ष कारावास व २ हजाराचा दंडाची शिक्षा सुनावली आहे(दंड न भरल्यास ६ महिन्याचा कारावास). या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. बी.यु. पाटील व अॅड. आर.पी. गावीत यांनी काम पाहिले. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील व भरत लिंगायत यांच्याकडे होता.
यांची झाली होती फसवणूक
सुनिता महाजन, सुनिता मोरे, माधुरी कुलट, अनिता सपकाळे, रुपाली गवळी, मंजु शूरपाटणे, वंदना भारुळे, ममता खंगाळ, कल्पना बोरसे, पौर्णिमा आहिर, सुनिता गाढे, सुनिता भोसले, संगिता साळुंखे, माया इंगळे, संगीता भालेराव, माधुरी बोरनारे, वर्षा राजपूत, सुवर्णा मोहकर, यामिनी बºहाटे, मनिषा पाटील, दीपाली वारके, सुषमा राणे, सुनिता पाटील यांची फसवणूक झाली होती.