१४ लाखांचा टंचाई आराखडा अडीच कोटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 01:00 PM2020-02-25T13:00:58+5:302020-02-25T13:01:31+5:30
३७९ गावांसाठी ४०४ उपाययोजना प्रस्तावित
जळगाव : जि.प.ने घाईगर्दीत केवळ १४ लाखांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा सादर केला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी तो सुधारीत करण्याची सूचना केल्यानंतर आता २ कोटी ५० लाख ६० हजारांचा ३७९ गावांसाठी ४०४ उपाययोजना असलेला सुधारीत आराखडा जि.प.ने सादर केला आहे. तो मंज़ुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
जि.प.कडून संभाव्य पाणीटंचाई आरखडा तयार करण्यात आला. प्रारंभी तो आराखडा सुमारे २ कोटी १२ लाखांचा होता. त्यात २९१ गावांचा समावेश करून त्यात टंचाई निर्मुलनासाठी सुमारे ३५६ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. मात्र जिल्हा प्रशासनाकडे तो सादर होण्यापूर्वीच त्यात काटछाट करीत तो अवघ्या १३ लाख ९० हजारांचा करण्यात आला. त्यात केवळ १८ गावांसाठी १८ उपाययोजना सुचविण्यात आल्या. जि.प.ने २०१९-२० साठी केवळ १८ गावांना १८ विशेष नळपाणी योजना दुरूस्ती योजनांची तरतूद असलेला अवघ्या १३ लाखांचा टंचाई आराखडा सादर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी फेरआढावा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
धरणगाव, पारोळ्यासाठी सर्वाधिक उपाययोजना
या सुधारीत आराखड्यात अमळनेर तालुक्यातील ६८ गावांसाठी ६८ तर धरणगाव तालुक्यातील ४८ गावांसाठी ४५ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. विंधनविहिरी/कूपनलिका घेणे १२९ गावांना १५१ उपाययोजना, नळपाणी योजना विशेष दुरूस्ती १५ गावांना १५ योजना, विंधन विहिरी दुरूस्ती २ गावांना २ विहिरी, तात्पुरती नळपाणी योजना ४ गावांना ५ योजना, टँकरने पाणीपुरवठा २ गावांना २ टँकर, खाजगी विहिर अधिग्रहण २१९ गावांना २२० विहिरी आदी उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत.