भर थंडीत मानाचा 'सरपंच चषक' पटविण्यासाठी साकेगावातील २४ संघातील ३६० खेळाडूंचा कसून सराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 03:45 PM2019-12-24T15:45:46+5:302019-12-24T15:46:51+5:30
ग्रामपंचायत साकेगाव व जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटना, टेनिस क्रिकेट संघटना आयोजित ‘सरपंच चषक सीजन-६’साठी गावातील २४ संघातील ३६० खेळाडू मानाचा सरपंच पटकविण्यासाठी भर थंडीत कसून सराव करीत असून, विजेत्या संघाचा वर्षभरासाठी फोटो ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक संघ प्रयत्न करीत आहे.
भुसावळ, जि.जळगाव : ग्रामपंचायत साकेगाव व जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटना, टेनिस क्रिकेट संघटना आयोजित ‘सरपंच चषक सीजन-६’साठी गावातील २४ संघातील ३६० खेळाडू मानाचा सरपंच पटकविण्यासाठी भर थंडीत कसून सराव करीत असून, विजेत्या संघाचा वर्षभरासाठी फोटो ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक संघ प्रयत्न करीत आहे.
गावातील खेळाडूंचे आरोग्य सुदृढ सुप्त गुणांना वाव मिळावे, निरामय आरोग्य राहावे, व्यसनापासून दूर राहून मैदानाची आवड निर्माण व्हावी, गावाचा नावलौकिक व्हावा, खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळावी याकरिता ग्रामपंचायत साकेगाव, जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच वर्षांपासून यशस्वी सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
गावाचा उत्सव, सुट्टी रजा टाकून येतात देशभरातून चाहते
सरपंच चषक गावातील खेळाडूंसाठी पर्वणी असते. यात सहभाग घेण्यासाठी शासकीय व निमशासकीय सेवेत देशातील ठिकठिकाणी नोकरीसाठी गेलेले पोलीस, अभियंते, रेल्वे कर्मचारी, मक्तेदार हे गावात रजा टाकून स्पर्धेत सहभाग घेतात व साकेगाव सरपंच चषक उत्सवाचा आनंद द्विगुणित करतात.
मैदान सज्ज
राष्ट्रीय महामार्गावर जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर ‘सरपंच चषक’साठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मैदानाचे सपाटीकरण व विशेष मातीची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. या मैदानावर मानाचा सरपंच चषक पटवण्यासाठी खेळाडू सकाळ-दुपार-संध्याकाळ सराव करून घाम गाळात आहेत.
विजेत्या व उपविजेत्या संघास रोख बक्षीस
सरपंच चषक स्पर्धेत विजेत्या संघास ग्रामपंचायत प्रशासनातर्फे २५ हजार, माजी सरपंच आनंद ठाकरे यांच्याकडून पाच, डॉ.दीपक पाटील यांच्याकडून तीन हजार सर्व मिळून ३३ हजारांचे तर उपविजेत्या संघास जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटनेतर्फे पाच पप्पू पटेल यांच्यातर्फे पाच असे १० हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
विजेता संघाचा वर्षभर ग्रामपंचायत कार्यालयात फोटो
स्पर्धेतील विजेत्या संघाची डीजेच्या तालावर गावातून सवाद्य मिरवणूक काढली जाते. तसेच विजेत्या संघाचा मान म्हणून वर्षभरासाठी ग्रामपंचायत कार्यालयात फोटो लावण्यात येतो. परिणामी सर्वच संघ कसून सराव करीत आहेत.