गिरणेतून चौथे आवर्तन सुटले! २ हजार क्यूसेस पाणी पिण्यासाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 05:19 PM2023-05-14T17:19:46+5:302023-05-14T17:19:59+5:30
यंदा पिण्याच्या पाण्याची टंचाई सौम्य आहे. मोजक्याच गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र स्वरुपाची आहे. त्या गावांसाठी चौथे आवर्तन लाभदायी ठरणार आहे.
जळगाव : गिरणा धरणातून रविवारी सायंकाळी चौथे आवर्तन सोडण्यात आले. चौथे आवर्तन बिगरसिंचनासाठी असून त्याचा लाभ १०८ गावांना होणार आहे. रब्बी हंगामासाठी यापूर्वी तीन आवर्तन सोडण्यात आले होते. आता दोन आवर्तन पिण्यासाठी सोडण्यात येणार आहेत. त्यानुसार रविवारी चौथे आवर्तन सोडण्यात आले.
या गावांना फायदा
यंदा पिण्याच्या पाण्याची टंचाई सौम्य आहे. मोजक्याच गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र स्वरुपाची आहे. त्या गावांसाठी चौथे आवर्तन लाभदायी ठरणार आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल व जळगाव तालुक्यातील १०८ गावांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. तसेच भडगाव व पाचोरा पालिका हद्दीतही या पाण्यामुळे टंचाईवर मात करता येणार आहे.
२ हजार क्यूसेस पाणी
चौथ्या आवर्तनामध्ये २ हजार क्यूसेस पाणी सोडले जाणार आहे. तर १४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असणार आहे. जलसंपदा विभागासोबत पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत यंदा पाच आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता. पाचवे आवर्तन जून महिन्यात सोडण्यात येणार आहे.
चौथे आवर्तन बिगर सिंचनासाठी आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यादृष्टीने आवर्तन सोडण्यात आले आहे. जनतेने पाण्याचा जपून वापर करावा. सिंचनासाठी पाण्याची उचल केली जात असल्याचे लक्षात आल्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
-देवेंद्र अग्रवाल, अधीक्षक अभियंता, गिरणा पाटबंधारे.