दरोड्याच्या गुन्ह्यात २० लाखाचा ऐवज हस्तगत; आठ जणांच्या अटकेसह एक बालक ताब्यात
By सुनील पाटील | Updated: May 27, 2024 19:53 IST2024-05-27T19:53:14+5:302024-05-27T19:53:24+5:30
जळगाव, दहिवदची घटना : आठ जणांच्या अटकेसह एक बालक ताब्यात

दरोड्याच्या गुन्ह्यात २० लाखाचा ऐवज हस्तगत; आठ जणांच्या अटकेसह एक बालक ताब्यात
जळगाव : शहरातील सौरभ ज्वेलर्स व दहिवद (ता. चाळीसगाव) येथे पडलेल्या दरोड्याच्या घटनेत पोलिसांनी आतापर्यंत २० लाखाचा ऐवज हस्तगत केला असून आठ जणांचा अटक तर एका विधीसघर्षीत बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. यासंदर्भाची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
दहिवद गावात १२ मे रोजी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी घनःशाम धर्मराज पाटील-वाघ यांच्या घरात दरोडा टाकून घरातील रोकड व सोन्याच्या दागिन्यांसह १६ लाख १५ हजारांचा ऐवज लुटून नेला होता. मेहुणबारे पोलिस ठाण्यात दाखल हा दरोड्याचा गुन्हा चौदा दिवसानंतर उघडकीस आला आहे. अटकेतील संशयीतांना पेालिसी खाक्या दाखवताच संशयीतांनी गुन्ह्याची कबुली देत १६ लाख १५ हजारांचा ऐवज काढून दिला आहे. कालूसिंग हुजारीया बारेला(वय-५२), सुनील मुरीलाल बारेला(वय-२१,रा.बुलवाणीया सेंधवा) यांच्यासह एक विधीसंघर्षीत बालक अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले.
यापूर्वी सराफ बाजारात तीन मोठे गुन्हे पचवले सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्स दरोडा प्रकरणात सहा संशयीतांच्या टोळीला अटक करुन पेालिसांनी त्यांच्याकडून आज अखेर ४ लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अटकेतील टोळीने यापुर्वी सराफ बाजारात तीन मोठे गुन्हे पचवल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली. त्या गुन्ह्यांचा मास्टरमाईंड रितेश संतोष आसेरी असल्याचे निष्पन्न झाले.
रणजीत सिंग जिवनसींग जुन्नी(वय-३२), सागरसिंग जिवनसींग जुन्नी(वय-३५), झेनसिंग ऊर्फ लकी जिवनसींग जुन्नी(वय-३४)राम ऊर्फ सोनू भगवानसारवान(वय-२९),रितेश संतोष आसेरी(वय-४४), दिपक भक्तराज गोयर(वय ३४) अशा सहा संशयीतांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे.अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक अधीक्षक अभयसिंग देशमुख, गुन्हेशाखेचे निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हे गुन्हे उघडकीस आणले.